खासदार धनंजय महाडिक यांचे आयटीआय प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन
कोल्हापूर WATCH TEAM: विकसित भारताच्या निर्मितीत युवकांची भूमिका महत्त्वाची असून, प्रत्येक तरुणाने लोकशाही मूल्यांचे जतन करत मतदानाचा हक्क बजावावा आणि जबाबदार नागरिक म्हणून योगदान द्यावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित ‘विकसित भारत युवा संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी खासदार महाडिक यांनी मतदानाचे महत्त्व, निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. विकसित भारतासाठी कौशल्याधारित व व्यवसायाभिमुख शिक्षण घेऊन स्वयंरोजगार निर्माण करण्यासह इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
मंत्रालयाचे प्रतिनिधी शुभांग शिरोडकर यांनी मतदार यादी नोंदणी व अद्ययावतीकरण प्रक्रियेची माहिती दिली. जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख यांनी ‘माय भारत’ पोर्टलवरील युवकांसाठीच्या संधी व उपक्रमांची माहिती दिली. अधीक्षक गणेश भोसले यांनी लोकशाही मूल्यांचे महत्त्व स्पष्ट करून प्रशिक्षणार्थींना लोकशाहीची शपथ दिली.
प्रशिक्षणार्थींनी निवडणूक प्रक्रिया, एसआयआर आणि स्टार्टअपविषयी विचारलेल्या प्रश्नांना मान्यवरांनी उत्तरे दिली.कार्यक्रमाला संस्थेचे प्राचार्य महेश आवटे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी सतीश माने, अभिजीत पोवार, शिल्प निदेशक, गट निदेशक, प्रशिक्षणार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.


























