१५ हजारांची मागणी, १२ हजार घेताना खासगी इसम जाळ्यातकोल्हापूरWATCH TEAM : शेतकऱ्याच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील क्षेत्राची दुरुस्ती आणि नावाची नोंद करण्यासाठी तब्बल १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी! अखेर तडजोडीनंतर १२ हजार रुपये स्वीकारताना खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. कोल्हापुरातील नागाव येथे ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या या कारवाईमुळे महसूल विभागातील कामकाजाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रारदाराच्या वडिलोपार्जित जमिनीचे क्षेत्र सातबारा उताऱ्यावर चुकीचे नोंदविण्यात आले होते. ही चूक दुरुस्त करून योग्य क्षेत्राची नोंद करावी तसेच सातबारा उताऱ्यावर स्वतःचे नाव लावावे, यासाठी तक्रारदाराने हातकणंगले तहसीलदार कार्यालयात अर्ज केला होता. पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण नागाव येथील तलाठी कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते.
ही बातमीसुद्धा जास्त वाचली गेली… लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत कोल्हापुर जिल्हयात भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती मोहीम सुरू… या प्रकरणी अवधूत रामचंद्र लोढे (वय ३७, खासगी उमेदवार, ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, नागाव) आणि सुरज कुंतीनाथ सोळांकुरे यांच्याविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक उत्कला भडकमकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास माने, सचिन पाटील, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल संमिला गावडे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार, वैभव खोत आणि प्रशांत दावणे यांनी सहभाग घेतला. महसूल कार्यालयातील नागरिकांच्या कामांसाठी खासगी व्यक्तींचा हस्तक्षेप कितपत योग्य? शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या सातबारा दुरुस्तीसाठीही अशा प्रकारांना सामोरे जावे लागत असेल, तर प्रशासकीय पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर येतो. या कारवाईतून संबंधित यंत्रणेनेही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. |


























