मुलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची बातमी! कोल्हापुरात १.२९ लाख मुलांना जंतनाशक गोळ्या

३ नोव्हेंबरला मॉप-अप दिन; १ ते १९ वर्षे वयोगटातील मुलांना गोळ्या देण्याचे महापालिकेचे नियोजन

कोल्हापूर (WATCH TEAM) : मुलांचे आरोग्य, पोषण आणि शारीरिक वाढ यांच्याशी संबंधित कृमीदोष रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने २७ ऑक्टोबरपासून राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील १ ते १९ वर्षे वयोगटातील १ लाख २८ हजार ९३७ मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ३ नोव्हेंबर रोजी या मोहिमेचा मॉप-अप दिन होणार आहे.

कृमीदोषाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम

मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतांमुळे मुलांमध्ये रक्तक्षय आणि कुपोषणाचा धोका वाढू शकतो. कृमीदोषामुळे मुलांची शारीरिक वाढ, ऊर्जा आणि अभ्यासातील एकाग्रता यांवरही परिणाम होऊ शकतो. वैयक्तिक स्वच्छता आणि परिसराची स्वच्छता राखण्याबरोबरच जंतनाशक उपचारांना महत्त्व आहे.

कोणाला मिळणार गोळ्या?

२७ ऑक्टोबर रोजी महानगरपालिका क्षेत्रातील अंगणवाड्या आणि इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गोळ्या देण्यात येणार आहेत. शाळेत न जाणाऱ्या १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींचाही या मोहिमेत समावेश आहे.

पहिल्या दिवशी गोळी घेता न आलेल्या पात्र लाभार्थ्यांसाठी ३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात आला आहे.

पालकांना महापालिकेचे आवाहन

शहरातील मुलांचे आरोग्य आणि पोषणस्थिती सुधारण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या १ ते १९ वर्षे वयोगटातील पाल्याला मोहिमेअंतर्गत जंतनाशक गोळी मिळेल याची खात्री करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.