कोल्हापूर महापालिकेची घरफाळा थकबाकीदारांवर कारवाई; दोन गाळे सील
थकीत करापोटी ३ लाख ३५ हजार रुपये वसूल
कोल्हापूर-TEAM WATCH: कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभाग आणि उपद्रव शोध पथकाने घरफाळा थकबाकीदारांविरोधात कारवाई केली. या मोहिमेत कसबा बावडा येथील गोळीबार मैदान परिसरातील दोन गाळे सील करण्यात आले. या गाळ्यांची एकूण थकबाकी १ लाख २२ हजार १८० रुपये आहे.
तसेच जवाहरनगर, सुभाषनगर, साळोखेपार्क आणि रविवार पेठ परिसरातील तीन वाणिज्यिक व दोन निवासी अशा पाच मिळकतींचे पाणी कनेक्शन खंडित करण्यात आले. या कारवाईदरम्यान थकीत घरफाळ्यापोटी ३ लाख ३५ हजार रुपये जागीच वसूल करण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, उपआयुक्त परितोष कंकाळ आणि करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये घरफाळा विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि उपद्रव शोध पथकातील जवान सहभागी झाले होते.































































