नाशिक-TEAM WATCH : एआयपासून दूर राहण्यात नव्हे, तर एआय शिकण्यात भविष्य आहे! मूलभूत ज्ञानाला एआयच्या कौशल्यांची जोड हा आर्थिक श्रीमंती व संपन्नतेचा खजिना आहे. एआयने मानवजात नष्ट होईल अशा खोट्या व अवैज्ञानिक गोष्टी सांगून विद्यार्थ्यांना घाबरवू नका, भारताला एआय पासून दूर करीत गुलाम ठेवण्यासाठीच्या षडयंत्राचे बळी ठरू नका असे आवाहन एआय तज्ज्ञ प्रा. डॉ. किरणकुमार जोहरे यांनी केले.
मविप्रच्या कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) विश्व : उदयोन्मुख करिअरच्या संधी, धोके आणि नवी क्षितिजे’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रो. डॉ. वसंत कदम होते.
व्यासपीठावर प्राचार्य डॉ. व्ही. बी. रसाळ, विभागप्रमुख प्रा. जनार्दन कुशारे, प्रा. निरंजन जाधव, प्रा. मीना जगताप, प्रा. सरला वाटपाडे, प्रा. गायत्री ताकाटे, प्रा. रोहिणी मोरे, प्रा. प्रनुजा भामरे आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. किरणकुमार जोहरे यांचा सन्मान करण्यात आला.
डेटा विश्लेषणातून घडवा भविष्य!
मूलभूत विषयांचे ज्ञान भक्कम करा, पायथन प्रोग्रामिंग व डेटा विश्लेषण शिका, छोटे प्रकल्प तयार करा आणि तंत्रज्ञानाचा वापर प्रत्यक्ष समस्यांवर उपाय शोधण्यासाठी करा, असा कृतीशील संदेश डॉ. जोहरे यांनी दिला. त्रपल बन्सल, नवीन राठोड, अंशुमन पात्रो, अंकित रायजादा आणि सागर पाटील यांसारख्या उद्योजक विद्यार्थ्यांच्या यशोगाथांतून त्यांनी नवकल्पना व उद्योगनिर्मितीची प्रेरणा दिली.
डीपफेक आणि सायबर हल्ल्यांपासून सावध राहा!
एआयमुळे नव्या संधी निर्माण होत असल्या, तरी डीपफेक, ऑनलाइन फसवणूक, सायबर हल्ले आणि पारंपरिक नोकऱ्यांमधील बदल ही आव्हानेही आहेत. त्यासाठी चिकित्सक विचार, डिजिटल सुरक्षितता आणि जबाबदार वापर आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य कौशल्ये, कल्पकता आणि मेहनतीच्या जोरावर तरुण स्वावलंबन व उद्योजकतेच्या संधी मिळवू शकतात, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक प्रा. निरंजन जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. प्रशांत कुलकर्णी व श्री. शिवप्रसाद गवळी यांनी परिश्रम घेतले. आभार प्रा. मीना जगताप यांनी मानले.


































































