महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती आणि कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचा जाहीर पाठिंबा
कोल्हापूरTEAM WATCH : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक मित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती आणि कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाने जाहीर पाठिंबा दिला आहे. जुनी पेन्शन योजना, शिक्षकांचे सेवाविषयक प्रश्न आणि शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसाठी प्रभावीपणे आवाज उठविण्याची भूमिका गावडे यांनी मांडली आहे.
महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीशी ७ हजारांहून अधिक शिक्षक संबंधित असल्याचे सांगण्यात आले. या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षक नेते दादासो लाड यांनी कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे मत देऊन पहिल्या फेरीतच विजयी करण्यासाठी शिक्षकांनी आतापासून कामाला लागावे, असे आवाहन केले.
शिक्षक मतदारसंघाचा प्रतिनिधी शिक्षकांचे प्रश्न विधिमंडळात प्रभावीपणे मांडणारा आणि शासन व शिक्षक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद साधणारा असावा. तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून कौस्तुभ गावडे यांना संधी द्यावी, असे मत लाड यांनी व्यक्त केले.
![]() |
![]() |
जुनी पेन्शन आणि शिक्षकांच्या हक्कांसाठी लढा
जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची आणि शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही कौस्तुभ गावडे यांनी दिली. जुनी पेन्शन, सेवाविषयक प्रश्न, अशैक्षणिक कामांचा वाढता भार आणि शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर ठोस प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील शिक्षक व कर्मचारी संघटना सातत्याने प्रयत्नशील आहेत. या प्रश्नासह शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविणे, निर्णयप्रक्रियेत त्यांचा आवाज बुलंद करणे आणि लोकशाही मार्गाने पाठपुरावा करणे आवश्यक असल्याची भूमिका गावडे यांनी मांडली.
यावेळी बाबा पाटील, दत्ता पाटील, सुरेश संकपाळ, संदीप पाटील, एम. आर. पाटील, दीपक पाटील, मनोहर पाटील, अशोक हुबळे, शिवाजी कोरवी, माजिद पटेल, डॉ. डी. एस. घुगरे, एम. एन. पाटील, अनिल चव्हाण, मदन निकम, आनंदा चव्हाण, संजय डवर यांच्यासह शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती आणि कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पाठिंब्यामुळे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवरील चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे. आता जुनी पेन्शन आणि अन्य मागण्यांसाठी पुढील काळात कोणते ठोस प्रयत्न होतात, याकडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
![]() |
![]() |
































































