‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’
कोल्हापूर – राधानगरी तालुक्यातील आवळी खुर्द येथे ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा अभिनव उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला असून, यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी थेट शेताच्या बांधावर जात शेतकऱ्यांशी संवाद साधला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमांतर्गत डॉ. जॅसमिन यांनी केवळ पाहणी न करता स्वतः शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतीच्या कामात सहभाग घेतला. त्यांनी स्वतः पॉवर टिलर चालवून शेताची चिखलणी केली आणि त्यानंतर उपस्थित शेतकरी व अधिकाऱ्यांसोबत भात रोपलावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
या दौऱ्यामध्ये आधुनिक, शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींवर विशेष भर देण्यात आला. भात पिकातील कीड नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे पक्षी थांबे आणि चिकट सापळे शेतात लावण्याच्या कामातही डॉ. जॅसमिन यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. तसेच, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी या प्रसंगी वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी डॉ. जॅसमिन यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी अत्यंत जिव्हाळ्याने संवाद साधत त्यांच्या अडचणी, शेतीपुढील आव्हाने आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासोबतच सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अधिकाधिक अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या अमृता डोंगळे, पंचायत समिती सदस्य संग्राम कलिकते, गटविकास अधिकारी संदीप भंडारी, तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, मंडळ कृषी अधिकारी अनिल भोपळे यांच्यासह जिल्हा परिषद, कृषी विभाग व ‘आत्मा’ संस्थेचे अधिकारी-कर्मचारी आणि परिसरातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











































































