पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते घाटकरवाडी येथे बोटिंग प्रकल्पाचे उद्घाटन

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

आजऱ्यात होणार हत्ती संगोपन केंद्र; पर्यटनालाही मिळणार मोठी चालना

जंगली हत्तींमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी

कोल्हापूर (आजरा) – आजरा तालुक्यातील जंगली हत्तींचा वावर आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे अतोनात नुकसान हा अनेक वर्षांपासूनचा चिंतेचा विषय आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आजरा तालुक्यात लवकरच ‘हत्ती संगोपन केंद्र’ (हत्ती कॅम्प) उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. ते आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथे जलसंधारण विभागाच्या तलावात नव्याने सुरू करण्यात आलेल्या बोटिंग प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

घाटकरवाडी आणि परिसरातील गावांमध्ये जंगली हत्तींकडून शेतीचे सातत्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. या पार्श्वभूमीवर, स्थानिक गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या गंभीर प्रश्नाबाबत निवेदन दिले. जोपर्यंत हत्ती संगोपन केंद्र पूर्णपणे कार्यान्वित होत नाही, तोपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे तात्काळ व्हावेत आणि त्यांना नुकसान भरपाईची मदत वेळेत मिळावी, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली. यावर बोलताना पालकमंत्री म्हणाले की, हत्तींच्या शेतातील मुक्त आणि अनिर्बंध संचारामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच हे ‘हत्ती संगोपन केंद्र’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्यातील सर्व गावकरी आणि शेतकऱ्यांनी आता याला संमती दर्शवली आहे. यामुळे हत्तींचा शेतातील वावर थांबेल आणि शेतीचे नुकसान टळेल.

घाटकरवाडी – महाराष्ट्राचे चेरापूंजी
यावेळी पालकमंत्र्यांनी बोटींग प्रकल्पाचे उद्घाटन करताना घाटकरवाडीच्या निसर्गसौंदर्याचे आणि पर्यटन क्षमतेचे विशेष कौतुक केले. त्यांनी स्वतः बोटींग करीत पर्यटनाचा आस्वाद घेतला. यावेळी ते म्हणाले, “घाटकरवाडी आणि किटवडे हा परिसर ‘महाराष्ट्राचे चेरापूंजी’ म्हणून ओळखला जातो, कारण राज्यात सर्वाधिक पाऊस याच भागात पडतो. इथल्या मातीला आणि निसर्गाला एक वेगळाच सुगंध आणि सौंदर्य आहे.” कोल्हापूर आणि मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणारे हजारो पर्यटक या नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी घाटकरवाडीत थांबू शकतील. याच अनुषंगाने पर्यटनाला चालना देण्यासाठी जलसंधारण विभागाच्या तलावात हा बोटिंग प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

एका बाजूला नयनरम्य तलावातील बोटिंग आणि दुसऱ्या बाजूला हत्ती संगोपन केंद्र, या दुहेरी आकर्षणामुळे भविष्यात घाटकरवाडी हे पर्यटनाचे एक मोठे ‘स्पॉट’ (केंद्र) म्हणून नावारूपाला येईल. हत्ती कॅम्प पाहण्यासाठी हजारो पर्यटक येथे भेट देतील, ज्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि परिसराचा आर्थिक विकास होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आणि पर्यटनाच्या या नव्या ओळखीसाठी पुढाकार घेणारे जलसंधारण विभागाचे अधिकारी, गुंतवणूकदार आणि ग्रामस्थ यांचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.