आयेशा शिकलगार गारगोटी केंद्रात विज्ञान शाखेत प्रथम; विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशाने महाविद्यालयाचा लौकिक उंचावला
गारगोटी प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत गारगोटी येथील श्री. आनंदराव आबिटकर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ने उज्ज्वल यश संपादन करत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली.
महाविद्यालयातील विद्यार्थिनी आयेशा शिकलगार हिने 81.33 टक्के गुण मिळवत गारगोटी केंद्रात विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच नम्रता जावडेकर हिने 76.67 टक्के गुणांसह केंद्रात तृतीय क्रमांक मिळवला. याशिवाय वैष्णवी चौगले हिने 75.83 टक्के, एन्जल रॉड्रिंक्स हिने 74.50 टक्के तर सई देसाई हिने 73.67 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर हे यश मिळवले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य तुकाराम माने यांनी सांगितले की, “महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहिले आहे. विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन आणि पालकांचा भक्कम पाठिंबा यामुळेच हे यश शक्य झाले आहे.” बारावीच्या निकालात मिळालेल्या या यशामुळे महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
























































