पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान… राधानगरी तालुक्यातील कार्यकर्त्या ठरल्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व…
कोल्हापूर (प्रतिनिधी) – सामाजिक कार्यकर्त्या व शांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा वर्षा आनंदा शिंदे राशिवडेकर यांना महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचा जिल्हास्तरीय ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हसरत जस्मिन तसेच महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड उपस्थित होते.
किशोरवयीन मार्गदर्शन ते महिला सक्षमीकरण — व्यापक कार्याचा ठसा
वर्षा शिंदे यांनी राधानगरी तालुक्यासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी किशोरवयीन मुला-मुलींना मानसिक ताणतणाव, अभ्यासाचे दडपण, परीक्षेची भीती, अपयशाचा सामना, स्वच्छता, सकस आहार, पौगंडावस्थेतील बदल याबाबत मोफत मार्गदर्शन केले. तसेच तंत्रज्ञान व सोशल मीडियाचा योग्य वापर, नैतिक मूल्ये यांसारख्या विषयांवरही जनजागृती केली आहे.
सामाजिक अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका
बालविवाह, बाल लैंगिक शोषण, मानव तस्करी, हुंडा प्रथा व बालकामगार यांसारख्या गंभीर विषयांवर त्यांनी प्रभावी जागृती मोहिमा राबवल्या. पीडित महिला व मुलींना समुपदेशनाद्वारे आधार देत त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्यही त्यांनी सातत्याने केले आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक झळापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2013, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, पोस्को कायद्यांच्या संदर्भात महिलांच्या मध्ये त्यांनी जनजागृती केली.
महिला सक्षमीकरण आणि नाविन्यपूर्ण उपक्रम
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कौशल्याधारित उपक्रम राबवणे, विवाहपूर्व समुपदेशन, बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न, ‘लेक वाचवा’ अभियानात सक्रिय सहभाग हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य ठरले आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत वृक्षारोपण करून करण्याची अभिनव संकल्पना त्यांनी राबवली. तसेच नवमातांना वनऔषधी रोपे देऊन पर्यावरणपूरक संदेश दिला.
समाजासाठी समर्पित जीवन
तनिष्क ग्रुपच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम, आरोग्य शिबिरे, सामाजिक उपक्रम राबवले. २०१२ पासून विधवा महिलांच्या हस्ते कार्यक्रम आयोजित करून सामाजिक समतेचा संदेश दिला. रक्तदानाचे महत्त्व पटवून देताना त्यांनी स्वतः नऊ वेळा रक्तदान केले आहे. कोरोना काळात कोविड सेंटरमध्ये समुपदेशनाचे उल्लेखनीय कार्य केले.
कुटुंबाचा पाठिंबा
या कार्यात त्यांना सासूबाई द्वारका शिंदे व पती आनंदा शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. समाजासाठी निःस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या वर्षा शिंदे यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला असून, त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.























































