नागांव( TEAM WATCH)/ रुपेश आठवले
शिरोली पुलाची येथे घडलेल्या कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाच्या निषेधार्थ हातकणंगले तालुक्यातील नागांव येथे बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. घटनेच्या निषेधासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र येत मोटरसायकल रॅली काढून संताप व्यक्त केला. रॅलीत महिलांचाही लक्षणीय सहभाग होता.सकाळपासूनच गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वपक्षीय कार्यकर्ते, व्यापारी तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून निषेधात सहभाग नोंदवला. गावातून काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशा घोषणा देण्यात आल्या.दरम्यान, काही ठिकाणी उघडी असलेली दुकाने बंद करण्यावरून व्यापारी व कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ शाब्दिक वाद झाले. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित व्यापाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत आपले व्यवहार बंद ठेवले.रॅलीच्या समारोपप्रसंगी ग्रामपंचायत प्रशासन व शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.
अशा घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत असून गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसण्यासाठी कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिरोली पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी पंचायत समिती सदस्य अरुण माळी, उपसरपंच सुधीर पाटील, विकास आघाडीचे नेते विजय पाटील, अनिल शिंदे, अभिनंदन सोळांकुरे, संजय शिंदे, भाजपा महिला पूर्व जिल्हा चिटणीस आश्विनी पाटील, ज्योती माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनीता पोवार, राहुल पाटील, राजेंद्र पाटील, किशोर शिंगे, भिमराव खाडे यांच्यासह ग्रामस्थ व विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.























































