अल्प व्याजदरात संपूर्ण जिल्हाभर योजना प्रभावीपणे राबविणार संचालक मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पी. एम. सूर्यघर योजनेअंतर्गत घरगुती सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी कर्ज पुरवठा करणार आहे. बँकेच्या अल्प व्याजदराच्या अर्थसाहाय्यातून सबंध कोल्हापूर जिल्हाभर पी. एम. सूर्यघर योजना प्रभावीपणे राबविणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केडीसीसी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या विषयाला मंजुरी देण्यात आली. गेल्या आर्थिक वर्षात बँकेला रू. २८७ कोटी इतका उच्चांकी ढोबळ नफा झाला आहे. त्याबद्दल विकास सेवा संस्थांच्या सचिवांना एक पगारापोटी रु. तीन कोटी बक्षीस व बँकेच्या नोकरदारांना अर्ध्या पगारापोटी रू. चार कोटी बक्षीस देण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. याबाबत अधिक माहिती अशी, व्यक्तिगत व विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून राबवावयाच्या या कर्ज धोरणांतर्गत जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या ग्राहकांना सौरऊर्जा प्रकल्पासाठी कर्जपुरवठा केला जाणार आहे. संबंधित ग्राहक कोल्हापूर जिल्ह्याचा रहिवासी व स्वतःच्या नावावर घर, वीजमीटर असलेला असावा.
बँकेच्या या नवीन धोरणाची माहिती अशी, सध्या सरकारकडून एक किलोवॅटकरीता रू. ३० हजार, दोन किलोमीटर रू. ६० हजार व तीन किलोवॅट व त्यापेक्षा जास्त क्षमतेकरीता रू. ७८ हजार रुपये अनुदान प्रचलित आहे. सबंध जिल्हाभरात आतापर्यंत फक्त २१,०८४ वीज ग्राहकांनीच या योजनेचा लाभ घेतला आहे. यापैकी बहुतांशी लाभार्थी शहरी भागातीलच आहेत. तात्काळ भांडवल उपलब्ध होत नसल्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांशी ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतलेला नाही. बँकेकडून पुढीलप्रमाणे अल्प व्याजदरात अर्थपुरवठा केला जाणार आहे. जेणेकरून पहिली तीन वर्षे मासिक वीज बिलाएवढीच कर्ज हप्त्याची रक्कम भरल्यास पुढील २५ ते ३० वर्षे मोफत वीजपुरवठा मिळणार आहे.
असे आहे “सूर्यशक्ती” कर्ज धोरण….
● एक किलो वॅटकरीता सहा टक्के व्याजदराने कर्ज रु. ६५ हजार. शासन अनुदान रू. ३० हजार. उर्वरित कर्ज रू. ३५ हजारसाठी ५० महीने मुदत व मासिक कर्जहप्ता रू. ७९३. सध्याचे मासिक सरासरी विज बिल रू. ८००.
● दोन किलो वॅटकरीता सात टक्के व्याजदराने कर्ज रू. सव्वा लाख. शासन अनुदान रू. ६० हजार. उर्वरित कर्ज रु. ६५ हजारसाठी ३६ महीने मुदत व मासिक कर्जहप्ता रू. २,००७. सध्याचे मासिक सरासरी विज बिल रू. २,२८१.
● तीन किलो वॅट व त्यावरील क्षमतेकरीता आठ टक्के व्याजदराने रु. १,८५,०००. शासन अनुदान रू. ७८ हजार. उर्वरित कर्ज रु. एक लाख, सात हजारसाठी ३६ महीने मुदत व मासिक कर्जहप्ता रू. ३,३५३. सध्याचे मासिक सरासरी विज बिल रू. ३,७२५.
निर्धार शून्य वीज बिलाचा…!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, संपूर्ण जगासाठीच सूर्य हा अखंड व मोफत ऊर्जेचा कधीही न संपणारा खजिना आहे. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली “पी. एम. सूर्यघर योजना” घरोघरी राबवूया. या योजनेमुळे सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून निर्माण झालेली वीज मोफतच मिळेल. म्हणजेच; एकदा ही योजना आपापल्या घरांच्या छतावर राबविल्यानंतर आपले दरमहा येणारे वीज बिल शून्य होईल. पर्यायाने, पर्यावरणाच्या संरक्षणालाही हातभार लागेल. यामुळे अपारंपारिक ऊर्जेतून वीज निर्मिती करणारा जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय पातळीवर लौकिक निर्माण होईल.
या बैठकीला उपाध्यक्ष माजी आमदार राजूबाबा आवळे, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार डाॅ. राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार अमल महाडिक, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैया माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, विजयसिंह माने, राजेश पाटील, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे व गजानन पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.























































