डॉ. जयसिंगराव पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

इतिहासाचे समृद्ध पान अनंतात विलीन

कोल्हापूर – महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील देदीप्यमान व्यक्तिमत्त्व आणि मराठेशाहीचे पुराव्यानिशी अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे वयाच्या ८५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात पंचगंगा घाटावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या महिन्यापासून ते फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या जाण्याने इतिहासकार, साहित्यिक, राजकारणी आणि सामान्य वाचकांमध्ये शोककळा पसरली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह राज्यभरातील नेते व लेखकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

डॉ. जयसिंगराव पवार यांचा जन्म ३० डिसेंबर १९४१ रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर गावी एका सामान्य कुटुंबात झाला. गरिबी व संघर्ष असूनही त्यांनी जिद्दीने कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून एम.ए. (सर्वोत्कृष्ट) आणि शिवाजी विद्यापीठातून पीएच्.डी. पदवी संपादन केली. १९६४ पासून डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करून त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून सेवा दिली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

मराठा इतिहासातील दुर्लक्षित पैलूंवर प्रकाश टाकणारे डॉ. पवार यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे ‘महाराणी ताराबाई’ व ‘राजर्षी शाहू छत्रपती’ ही चरित्रे होत. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर औरंगजेबाविरुद्ध स्वराज्य टिकवण्यात ताराबाईंचा मोलाचा वाटा होता, हे पुरेशा पुराव्यानिशी सिद्ध करून त्यांनी इतिहासाच्या मांडणीला नवे वळण दिले. त्यांनी एकूण ५० हून अधिक ग्रंथ आणि ४५ शोधनिबंध लिहिले असून ‘सेनापती संताजी घोरपडे’, ‘मराठेशाहीचा मागोवा’ यांसारखे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. १२०० पानांचा, तीन खंडांचा ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’ संपादित करून त्यांनी तो भारताच्या १६ भाषांसह रशियन, फ्रेंच, जर्मन इत्यादी भाषांमध्ये अनुवादित केला. माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील व प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तसेच १९९२ मध्ये स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी’चे ते संस्थापक-संचालक व शाहू संशोधन केंद्राचे संचालक म्हणून कार्यरत राहिले. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे संस्थापक-सदस्य म्हणून तीन वर्षे त्यांनी अध्यक्षपद भूषवले.

राजर्षी शाहू स्मारक ट्रस्ट व जिल्हा प्रशासनाला ऐतिहासिक सल्ले देऊन त्यांनी शाहू मिल आणि खासबाग मैदान यांचे जतन केले. महात्मा फुले व शाहू महाराजांच्या सत्यशोधकी विचारांचे खंदे पुरस्कर्ते असलेले डॉ. पवार हे इतिहासाची तटस्थ आणि मानवी मूल्यांवर आधारित मांडणी करत असत. गुरुवारी सकाळी १०.०० वाजता ‘शिवतेज’ बंगला, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर येथून त्यांची अंत्ययात्रा निघाली. साने गुरुजी वसाहत, जुना वाशी नाका, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, खासबाग मैदान, बिंदू चौक, पद्मा टॉकीज, दसरा चौक (राजर्षी शाहू पुतळा), शाहू स्मृतीस्थळ, जुना बुधवार पेठ मार्गे ही यात्रा पंचगंगा स्मशानभूमीत पोहोचली. यावेळी शासन-प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी अमोल येडगे, तर कोल्हापूरवासीयांच्या वतीने खासदार शाहू छत्रपती यांनी डॉ. पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.

याप्रसंगी पोलिसांनी बंदुकीच्या ३ फैरी झाडून त्यांना मानवंदना (सलामी) दिली, तसेच पोलीस धूनही सादर करण्यात आली. यावेळी डॉ. पवार यांच्या कुटुंबातील सदस्य प्रा. डॉ. अरुंधती पवार, डॉ. प्रा. मंजुश्री पवार, पृथ्वीराज पवार आणि रिया पवार तसेच खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार जयंत आसगावकर, पद्मश्री प्रतापसिंह जाधव, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, पोलीस उपाधिक्षक श्रीमती प्रिया पाटील, होम डीवायएसपी तानाजी सावंत, इतिहास अभ्यासक-संशोधक डॉ.इंद्रजीत सावंत, प्रा. रमेश जाधव, राजेश लाटकर, आझाद नाईकवाडी, माजी महापौर आर. के. पोवार, ॲड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, बाळ पाटणकर, हर्षल सुर्वे, सुरेंद्र जैन, मेधा पानसरे, आदिल फरास, श्रीराम पवार, विजय देवणे, अजेय दळवीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘डॉ. जयसिंगराव पवार अमर रहे’ अशा घोषणा देत हजारो कोल्हापूरवासीयांनी इतिहासाच्या या साक्षेपी अभ्यासकाला श्रद्धांजली अर्पण करून साश्रू नयनांनी अंतिम दर्शन घेतले.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.