सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप
कोल्हापूर (विनायक जितकर) – जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना दृष्टीदोष असूनही आर्थिक अडचणीमुळे चष्मा घेणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या सहकार्याने ‘व्हिजन फॉर ऑल’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत आर.बी.एस.के. कार्यक्रमातून शासकीय व निमशासकीय शाळांमधील गरजू मुला-मुलींना मोफत चष्मे देण्यात येत आहेत.
या उपक्रमाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ५ हजार २८० विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वितरित करण्यात आले आहेत. तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे – आजरा १९९, भुदरगड १७४, चंदगड २८, गडहिंग्लज २१२, गगनबावडा १८, हातकणंगले ६८४, कागल १८७, करवीर ४०५, पन्हाळा ४६३, राधानगरी ६३२, शाहूवाडी २३१, शिरोळ ८४०, कोल्हापूर महानगरपालिका ५१९ व नगरपालिका क्षेत्रात ६८८ विद्यार्थ्यांना चष्मे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने उपस्थित होते.
दि. १४ मार्च रोजी हॉटेल वृषाली येथे झालेल्या कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये कु. मुक्ती राजू भस्मे (इंदुमती गर्ल्स हायस्कूल), कु. संध्या शिवाजी गवळी (जरगनगर विद्यालय), कु. माहिन जमीर शिकलगार (जरगनगर विद्यालय), इमामहुसेन मलिक पठाण (टेंबलाईवाडी विद्यालय), माधव कैलास सूर्यवंशी (वीर ककया विद्यालय), मेघराज कुमार कांबळे (गोविंद पानसरे विद्यामंदिर) आणि जय धोडीराम शिंदे (कोटितीर्थ विद्यालय) या विद्यार्थ्यांना चष्मे देण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी मदत होणार असून त्यांच्या दृष्टी आरोग्यातही सुधारणा होण्यास हातभार लागणार आहे.

















































