सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना मागणीचे निवेदन
कोल्हापूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीरनगरीत सध्या निर्माण झालेल्या सिलिंडर टंचाईचा मोठा परिणाम सामाजिक, सेवाभावी संस्था आणि परिसरातील अन्नछत्रांवर होत आहे. श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेण्यासाठी, श्री जोतिबा, तसेच श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील अन्नछत्रांसाठी अखंड इंधन पुरवठा व्हावा, या मागणीचे निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना देण्यात आले. ‘सध्या एकूणच व्यवस्थेत आम्ही सुधार करत आहोत. शासनाने जिल्हास्तरावर काही निर्णय घेण्यासाठी मुभा दिल्यास प्राधान्याने अन्नछत्रांचा विचार करू’, असे उत्तर या प्रसंगी पुरवठा अधिकार्यांनी दिले.
जिल्हाधिकार्यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट, श्री अंबाबाई भक्त मंडळ, कोल्हापुरी थाळी, उत्तरेश्वर थाळी, तसेच शहरातील शिवभोजन केंद्रे प्रतिदिन सहस्रो गजरू, भाविक आणि रुग्णांच्या नातेवाईकांना विनामूल्य किंवा अत्यल्प दरात अन्नदान करतात. या सेवेला गॅस टंचाईचा मोठा फटका बसत आहे. शासनाने आश्रमशाळा आणि रुग्णालयांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून अखंडित गॅस पुरवठ्याचे आदेश दिले आहेत. त्याच धर्तीवर कोल्हापुरातील अन्नछत्र आणि सामाजिक संस्थांनाही विशेष बाब म्हणून अखंडित गॅस पुरवठ्याची अनुमती द्यावी.
या प्रसंगी समन्वयक श्री. किशोर घाटगे, सर्वश्री मनोहर सोरप, विशाल शिराळकर, अशोक गुरव, शिवानंद स्वामी, योगेश केरकर, राजेंद्र तोरस्कर, महादेव पाटील, निरंजन शिंदे, संजय साळोखे, तन्मय मेवेकरी, सचिन पाटील, शीला माने, गीता रेवणकर यांसह अन्य उपस्थित होते.

















































