अभिनंदन करत नवनिर्वाचित सर्व सदस्यांना पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा
गारगोटी प्रतिनिधी – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित जि. प. व पं. स. सदस्यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात गारगोटी येथील नामदार प्रकाश आबिटकर यांच्या संपर्क कार्यालयात पार पडला. यावेळी नामदार आबिटकर यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळात लोकांची सेवा करण्यास कमी पडू नका, जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचे आवाहन केले. आपण विकासाला मतदान मागितले. त्यामुळे विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. नामदार आबिटकर यांनी आपल्या भाषणात मतदार, कार्यकर्ते आणि समर्थकांचे मनःपूर्वक आभार मानत नवनिर्वाचित सर्व सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पुढे बोलत असताना नामदार आबिटकर म्हणाले की, मतदारांनी विकास, पारदर्शकता आणि जनहिताच्या कामांवर शिक्कामोर्तब केले आहे. मतदारांनी दिलेला कौल हा विकासाच्या अपेक्षेने दिलेला आहे; त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची दक्षता घ्या, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे शिवसेनेचे धोरण अंमलात आणून सर्वसामान्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्या असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.
यावेळी शरद सहकारी सूतगिरणीचे चेअरमन बी.एस. देसाई (आण्णा), जेष्ठ नेते के.जी.नांदेकर, निवासराव देसाई, गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, दत्ताजीराव उगले, प्रा.दौलतराव जाधव, कल्याणराव निकम, सुर्याजी देसाई, अशोकराव भांदीगरे, अंकुश चव्हाण, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या रोहिणी आबिटकर, अर्चना निकम, सारिका नांदेकर, पंचायत समिती सदस्य विक्रमसिंह पाटील, सुनील किरोळकर, धनंजय लाड, अरुणा देसाई, कल्याणी फगरे यांच्यासह सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक दत्ताजीराव उगले यांनी, आभार रणधीर शिंदे तर सूत्रसंचलन मिलिंद पांगिरेकर यांनी केले.

















































