गर्भाशयमुख कर्करोगमुक्त महाराष्ट्रासाठी ९ लाख ८४ हजार मुलींना एचपीव्ही लसीकरण… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

महिलांच्या आरोग्यासाठी आरोग्य सेवा अधिक बळकट पुढील तीन महिन्यांत लसीकरण पूर्ण करण्यात येणार

मुंबई – प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्या महिला व्यावसायिक आणि कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. महिलांची काळजी घेणे महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आरोग्य विभागासह आपल्या सर्वांचे जबाबदारी असून त्या दृष्टिकोनातून महिलांसाठी पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा आणखी बळकट करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आरोग्य विभागाने गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी सुरू केलेली एचपीव्ही मोहीम निश्चित यशस्वी होईल व ९ लाख ८४ हजारांहून अधिक मुलींना गर्भाशयमुख कर्करोगापासून बचावासाठी संरक्षण मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. महिलांच्या आरोग्यासाठी आरोग्य सेवा अधिक बळकट करून ‘आरोग्य आपल्या दारी’ अभियान राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

जागतिक महिला दिनानिमित्तआरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकारांचा तसेच सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या स्त्रीरोग तज्ज्ञ, स्त्री शल्यचिकित्सक, परिचारिका, आरोग्य सेविका यांचा यावेळी गौरव करण्यात आला. ग्रामीण व दुर्गम भागात मातृत्व व बाल आरोग्य, कर्करोग प्रतिबंध आणि जनजागृती मोहिमांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.

जागतिक महिला दिनी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यभरात १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींसाठी गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे झाला. या मोहिमेअंतर्गत राज्यातील ९ लाख ८४ हजार ४१४ मुलींना एचपीव्ही लस देण्याचे लक्ष्य आरोग्य विभागाने ठेवले असून पुढील तीन महिन्यांत हे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर,विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्याच्या कुपोषण निर्मूलन टास्क फोर्सचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) आणि माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर संजय घाडी, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन,आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव दूरदृष्टी प्रणालीद्वारे कार्यक्रमाला उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक प्रकारच्या आजारांचे प्रमाण सध्या वाढले आहे. आजार होऊच नये यासाठी प्रतिबंध करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. कर्करोग होऊ नये यासाठी प्रतिबंध करणे आवश्यक आहे. गर्भाशयमुख कर्करोग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. ही लस प्रभावी असून या मोहिमेमुळे गर्भाशयमुख कर्करोगाला निश्चित आळा घातला जाईल. जगात असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यामध्ये महिला आपले कर्तृत्व बजावताना दिसत नाहीत. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान होत आहे. त्यामुळे महिलांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ग्रामीण स्तरावर चांगले प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यासाठी आरोग्य सेवा अधिक बळकट करणे गरजेचे आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, स्त्रियांच्या वाटेला नेहमीच दुर्लक्ष केले जाते. महिलांच्या शारीरिक आरोग्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. यासंदर्भात खासगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये समुपदेशन करण्याची गरज आहे. गर्भपाताच्या बाबतीत महिलांमध्ये अजूनही काही गैरसमज आणि अचूक माहितीचा अभाव आहे. त्यामुळे महिलांमध्ये जागृती निर्माण करून काही कायदेशीर बदल करण्याचीही गरज असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. महिलांच्या आरोग्याविषयी काळजी घेण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे असे स्पष्ट करताना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “आरोग्य विभागामार्फत गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविण्याचा आरोग्य विभागाचा मनोदय होत., यासाठी राज्य शासनाने पाठपुरावा करून हे लसीकरण उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले. केंद्र सरकारने आणि पंतप्रधान यांनी विशेष पुढाकार घेऊन याविषयी पुढाकार घेऊन राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर एचपीव्ही लस उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता ही मोहीम राज्यात राबविली जात आहे. कर्करोग प्रतिबंधासाठी तपासणी अत्यंत महत्त्वाची असून तपासण्यांचे प्रमाण वाढवण्याची आवश्यकता आहे. गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम पुढील तीन महिने राज्यात चालणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आलेले आहे. तीन महिन्यानंतर तो नियमित लसीकरणाचा भाग होईल. सध्या काही समाज माध्यमांवर एचपीव्ही लसीबाबत चुकीची माहिती आणि अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे, मात्र पत्रकार आणि समाजातील जागरूक लोकांनी वस्तुस्थिती मांडली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जगभरात 160 देशांनी एचपीव्ही लसीकरण केले आहे. भारत हा 161 वा देश आहे. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे अनावश्यक भीती काढून आशादायक परिस्थिती आणि वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. आरोग्य विभागातील महिला डॉक्टर, परिचारिका, आशा स्वयंसेविका या विभागाची संपत्ती आहेत. त्यांना अजून प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. आरोग्य विभागामार्फत यापुढेही सकारात्मक, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि मोफत दिली जाईल”, अशी ग्वाही आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी दिली. सर्व पालकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या १४-१५ वर्षांच्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी केले.

राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महिलांच्या आरोग्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कायमच पाठीशी ठाम उभे राहिलेले आहेत. गर्भाशयमुख कर्करोगाच्या बाबतीत योग्य वेळेत अचूक निदान होणे अत्यंत आवश्यक आहे. गर्भाशयमुख कर्करोगाला एचपीव्ही लसीकरणामुळे प्रतिबंध करणे शक्य आहे. योग्य वयात लसीकरण झाले तर गर्भाशयमुख कर्करोगापासून महाराष्ट्र निश्चित मुक्त होईल व एचपीव्ही लस सामान्य लोकांपर्यंत उपलब्ध होईल.

मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनीही यावेळी आपल्या भाषणात महिलांचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांनी केले, यात त्यांनी महिलांच्या आरोग्याबाबत काही प्रश्न उपस्थित करून उपस्थितांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावेळी सर्व जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी व आरोग्य संस्था दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमानंतर उपस्थितांचे आभार आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना साठे यांनी केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.