जिल्हा परिषदेत शिवसेना गटनेतेपदी अरुण जाधव यांची निवड

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

सदस्यांच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय

कोल्हापूर प्रतिनिधी (विनायक जितकर) – कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या गटनेतेपदी सदस्य अरुण मारुती जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शिवसेना व शाहू आघाडीच्या जिल्हा परिषद सदस्यांची संयुक्त बैठक सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषदेमधील आगामी राजकीय भूमिका, विकासकामे आणि पक्षाच्या संघटनात्मक मजबुती यावर सखोल चर्चा झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रकाश आबिटकर होते.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेनेचे एकूण ९ सदस्य असून शाहू आघाडीचे ४ सदस्य निवडून आले आहेत. शिवसेनेच्या सदस्यांमध्ये इंद्रजीत वसंत पाटील (वडणगे–करवीर), वर्षाराणी अरुण पाटील (कोतोली–पन्हाळा), रोहिणी अर्जुन आबिटकर (पिंपळगाव–भुदरगड), अर्चना कल्याण निकम (आकुर्डे–भुदरगड), सारिका यशवंत नांदेकर (कडगाव–भुदरगड), अरुण मारुती जाधव (कसबा वाळवे–राधानगरी), वर्षा अविनाश सावर्डेकर (आळते–हातकणंगले), अतिश नंदकुमार शिंगे (रुकडी–हातकणंगले) आणि शिवाजी मुरलीधर जाधव (रेंदाळ–हातकणंगले) यांचा समावेश आहे. शाहू आघाडीचे अमोल दादासो चव्हाण (उदगाव–शिरोळ), प्रचिता चंद्रकांत कोळी (नांदणी–शिरोळ), श्रद्धा अविनाश गायकवाड (अब्दुललाट–शिरोळ) आणि उत्तरा विजीत शिंदे (दत्तवाड–शिरोळ) हे चार सदस्य आहेत.

या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एकमताने अरुण जाधव यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली. जाधव हे जिल्हा परिषदेत स्पष्ट भूमिका, संयमी नेतृत्व आणि विकासाभिमुख दृष्टीकोनासाठी ओळखले जातात. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण तसेच शेतकरी व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेत शिवसेनेची भूमिका अधिक आक्रमक व प्रभावी राहील, विकासकामांना गती मिळेल आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. या निवडीसाठी झालेल्या बैठकीस पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर, जिल्हा प्रमुख विजय बलुगडे, जिल्हा प्रमुख रवींद्र माने, अरुण इंगवले, मुरलीधर जाधव, कल्याणराव निकम, दत्ताजीराव उगले, अशोक फराकटे, बाळासाहेब पाटील, राजेश पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.