SMART अंतर्गत खरेदीदार–विक्रेता संमेलनात बाजारजोडणीवर भर
कोल्हापूर – शेतकरी उत्पादक संस्थांनी केवळ सामंजस्य करारांपुरते मर्यादित न राहता पुढे जाऊन प्रत्यक्ष आणि मोठ्या प्रमाणात व्यवहार घडवून आणणे आवश्यक आहे. अशा व्यवहारांमुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळू शकतो, असे मत SMART प्रकल्पाचे विभागीय नोडल अधिकारी अजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत कृषी विभाग आणि पॅलेडियम कन्सल्टिंग इंडिया प्रा. लि. यांच्या तांत्रिक सहकार्याने विभागीय खरेदीदार–विक्रेता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात २२ खरेदीदार संस्थांचे २८ प्रतिनिधी, २५ शेतकरी उत्पादक संस्था (CBO) मधील ९० प्रतिनिधी तसेच २६ अधिकारी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विजय माईंडकर यांनी SMART प्रकल्पाचा आढावा सादर केला. SMART प्रकल्प सध्या अंतिम टप्प्यात असून उर्वरित कालावधीत संस्थांनी बाजारपेठेत ठोस पावले टाकून खरेदी-विक्री व्यवहार सुरू करणे गरजेचे असल्याचे अजय कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. “खरेदीदार–विक्रेता संमेलनाचा उद्देश केवळ संवाद किंवा करारापुरता मर्यादित नसून सातत्यपूर्ण आणि मोठ्या व्यवहारांमध्ये त्याचे रूपांतर होणे आवश्यक आहे,” असेही त्यांनी सांगितले. विपणन विषयावर मार्गदर्शन करताना सुभाष झुले यांनी बदलते बाजारपेठीय प्रवाह, स्पर्धात्मक विपणन पद्धती आणि ‘मेंट’ प्रकल्पाबाबत माहिती दिली. तसेच भौगोलिक निर्देशांक (GI) मानांकनामुळे उत्पादनांना स्वतंत्र ओळख मिळून अधिक दर मिळू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
संमेलनात खरेदीदार प्रतिनिधींनी गुणवत्ता निकष, ग्रेडिंग, पॅकेजिंग, प्रमाणपत्रे आणि सातत्यपूर्ण पुरवठा यांचे महत्त्व अधोरेखित केले. शेतकरी उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या उत्पादनांची माहिती देत उत्पादन क्षमता व उपलब्धतेविषयी सविस्तर माहिती मांडली. दुपारच्या सत्रात ‘वन-टू-वन’ खरेदीदार–विक्रेता बैठका आयोजित करण्यात आल्या. या बैठकीत कृषी व प्रक्रिया उत्पादनांच्या खरेदीबाबत थेट चर्चा झाली. संभाव्य विक्रेता नोंदणी, पूर्वकरार आणि पुढील व्यावसायिक व्यवहारांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
SMART प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक संस्थांचे एकत्रीकरण, प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया, गुणवत्ता हमी आणि बाजाराशी थेट संलग्नता साधण्यासाठी अशा व्यवहारकेंद्री उपक्रमांची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. ग्रामीण उत्पादक आणि शहरी ग्राहक यांच्यातील दरी कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत असल्याचेही सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कांबळे यांनी केले. कार्यक्रमासाठी आलेल्या खरेदीदार व विक्रेत्यांचे स्वागत राम मोहिते (टीम लीडर – पॅलेडियम) यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन धनंजय वाघ, रविंद्र जांभूळकर, गजानन रथकर, प्रदीप पाटील, रणजित आरेकर, कमलेश कांबळे आणि शीतल कळंगे आदींनी केले.

















































