विषमुक्त शेती ही काळाची गरज: प्राचार्य प्रोफे. डॉ. सुरेश जाधव
पिंपळगाव (बसवंत): कृषीप्रधान भारतात उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असून त्याचे गंभीर दुष्परिणाम म्हणजे घरोघरी कॅन्सर रोखण्यासाठी रासायनिक खतांच्या अतिरेक टाळायला हवा. याउलट जैविक खतांचा वापर वाढवणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन दीपक घंगाळे यांनी केले. मविप्र समाजाचे कर्मवीर काकासाहेब वाघ पिंपळगाव (ब.) महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित “नर्सरी तंत्रज्ञान व जैविक खतांवरील कौशल्यविकास कार्यशाळा” या एकदिवशीय कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रोफे. डॉ. सुरेश जाधव होते.
घंगाळे पुढे म्हणाले की, सेंद्रीय व विषमुक्त शेतीमुळे मातीचे आरोग्य टिकून राहते, उत्पादनाची गुणवत्ता वाढते तसेच पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत होते. दीर्घकालीन शेतीसाठी जैविक खतांचा वापर हाच शाश्वत मार्ग आहे.व्यासपीठावर मार्गदर्शक योगेश म्हेत्रे व योगेश होन, प्राचार्य प्रोफे. डॉ. सुरेश जाधव, कार्यशाळेचे समन्वयक व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रोफे. डॉ. सुलभा लालसरे, डॉ. अतुल मदने, प्रा. निकिता जाधव, डॉ. सचिन जाधव आदी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सुरेश जाधव यांनी वाढता रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर, मातीची घटती सुपीकता आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यावर भाष्य करत विषमुक्त शेती ही काळाची गरज बनल्याचे स्पष्ट केले.
कार्यशाळेत योगेश म्हेत्रे यांनी विविध भाजीपाला पिकांवरील कलम पद्धती व द्राक्षाच्या नवीन जातींसाठी विकसित आधुनिक कलम तंत्रज्ञानाची माहिती दिली. योगेश होन यांनी आधुनिक शेतीत प्रत्यक्ष उपयोगी पडणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत ६३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेचे प्रास्ताविक समन्वयक प्रोफे. डॉ. सुलभा लालसरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. अतुल मदने यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. निकिता जाधव यांनी तर आभार डॉ. सचिन जाधव यांनी मानले.


















































