शाळा वर्ग खोल्यांसाठी निधी मंजूर पत्राचे वितरण करताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सोबत गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे व इतर मान्यवर
अनुक्रमे १० लाख, ७ लाख व ५ लाखांचे पारितोषिक ६९ नवीन वर्गखोल्या बांधकामासाठी १२ कोटी रुपयांच्या निधी मंजूर पत्राचे वितरण
गारगोटी – कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शैक्षणिक कामगिरी, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि गुणवत्तेच्या आधारे निवड झालेल्या पहिल्या तीन शाळांना अनुक्रमे १० लाख, ७ लाख आणि ५ लाख रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात येणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. ते राधानगरी-भुदरगड-आजरा मतदारसंघातील ६९ नवीन वर्गखोल्या बांधकामासाठी व ५५ शाळांतील वर्गखोल्यांच्या दुरुस्तीकरिता जिल्हा नियोजन समितीकडून १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या मंजुरीपत्रांचे वितरण प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना नाम. आबिटकर म्हणाले, शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ आणि शाळांच्या भौतिक सुविधा उभारणीसाठी जिल्हाभरात हा उपक्रम राबविण्यात येणार असून, पुढील पाच वर्षांत तब्बल ५०० कोटी रुपयांचा निधी शाळांच्या पुनर्बांधणी व दुरुस्तीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. दरवर्षी १०० कोटी रुपयांचा निधी या उद्देशासाठी खर्च केला जाणार असल्याचे ना. आबिटकर यांनी स्पष्ट केले. शैक्षणिक दर्जा उंचावण्याबरोबरच शाळांची इमारती आणि सुविधा दर्जेदार व आधुनिक करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. कोल्हापूर जिल्ह्याची शैक्षणिक ओळख राज्यात आदर्श ठरावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शाळांच्या विकासासाठी खाजगी कंपन्यांच्या CSR निधीतून देखील सुविधा उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ना.आबिटकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमास गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, शरद सुतगिरण व्हा.चेअरमन अशोकराव फराकटे, कल्याणराव निकम, शिवसेना जिल्हाप्रमुख विजयराव बलुगडे, भाजपा नेते संभाजीराव आरडे, शिवसेना तालुकाप्रमुख तानाजीराव चौगुले, गोविंद चौगुले, युवानेते संदीप वरंडेकर, श्रीधर भोईटे, युवासेना तालुकाप्रमुख विद्याधर परीट, डी.पी.पाटील सर, संतोष पाटील, संदीप पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर व विविध गावचे सरपंच, ग्रा.पं.सदस्य, शिक्षण समितीचे अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी केले. तर राजेंद्र शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
शाळांच्या विकासासाठी ठरणार महत्त्वाचा टप्पा जिल्ह्यातील उत्कृष्ट शाळांना पारितोषिक जाहीर केल्याने त्यांच्यामध्ये सर्वच पातळीवर स्पर्धा निर्माण होणार आहे. त्याचबरोबर शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचवण्याबरोबरच जिल्ह्यातील शाळांच्या विकासासाठी लोकसहभाग आणि शासन सहकार्याचा नवा आदर्श निर्माण करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.













































