“*पदाधिकाऱ्यांचा संकल्प – प्रति शिर्डीतून विश्व महासंमेलनाची दीपज्योत प्रज्वलित*”
नागपूर : संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन, नागपूर – १७ व १८ जानेवारी २०२६ या दिवशी देशभरातील नामदेव भक्तांच्या सहभागाने भव्य स्वरूपात पार पडणार आहे. या ऐतिहासिक महासंमेलनाच्या पार्श्वभूमीवर २१ व २२ जून रोजी पुणे येथील प्रति शिर्डी या पावन स्थळी संपूर्ण भारतातील समाजातील सर्व पोटशाखेतील प्रमुख संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची अत्यंत स्फूर्तीदायक आणि आगळ्यावेगळ्या शैलीतील नियोजन बैठक पार पडली.
या बैठकीची सुरुवात एका अनुपम आध्यात्मिक अनुशासनाने झाली.– मंचावर फक्त आणि फक्त संत शिरोमणी नामदेव महाराजांचेच स्थान होते. कोणताही मान्यवर, अध्यक्ष, वक्ता मंचावर आसनस्थ नव्हता. सर्व पदाधिकारी मंचासमोर आसनस्थ होते. यामागील संदेश स्पष्ट होता – “नामदेव महाराज हेच खरे अधिष्ठान आहेत, आम्ही फक्त त्यांचे शिष्य आणि सेवक आहोत.” हे दृश्य उपस्थितांच्या अंतःकरणात खोलवर कोरले गेले.
भक्तिभावाने भरलेली ही बैठक श्री गणेश आरती, विठ्ठल आरती, आणि संत नामदेव महाराजांच्या आरतीने आरंभली.
बैठकीचे प्रास्ताविक नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजयजी नेवासकर यांनी करताना बैठकीच्या उद्देश आणि नियोजनाची सविस्तर माहिती दिली.
या नंतर महासंमेलनाचे मुख्य संयोजक ईश्वर धिरडे यांनी नागपूर येथील महासंमेलनाचे स्वरूप, समाजबांधवांची जबाबदारी, संमेलनाचे फायदे व आयोजनाची दिशा उर्जा देणाऱ्या शब्दांत मांडली. समितीचे अध्यक्ष श्री भास्कर टोंपे यांनी आर्थिक नियोजन मांडताना पारदर्शक व भक्कम आर्थिक रूपरेषा स्पष्ट केली. अनंत जांगजोड यांनी नागपूर येथे राहण्याच्या व भोजनाच्या व्यवस्थेचा तपशील दिला.
बैठकीत विविध राज्यांतून आलेल्या मान्यवरांनी सामाजिक, आध्यात्मिक व संघटनात्मक दृष्टिकोनातून मौल्यवान मार्गदर्शन केले.आम्ही सर्व एकजूट आहोत आणि लाखोंच्या संख्येने उपस्थित राहू असा संकल्प केला.
माजी आमदार देवळे यांनीही प्रेरणादायी शब्दांत सर्वांना एकजुटीचे बळ दिले.
प्रति शिर्डी येथे ही बैठक आयोजनासाठी जागा व उत्तम व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांनी त्यांचे आभार मानले. नामदेव समाजोन्नती परिषद तर्फे उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
बैठकीचा समारोप प्रवीणजी शिंत्रे यांच्या आभारप्रदर्शनाने झाला.
ही बैठक केवळ नियोजन नव्हे, तर एक प्रकारे भक्ती, एकात्मता आणि कार्यदिशा यांचे व्रत घेणारा एक पर्वसमान ऊर्जादायी क्षण ठरला.
आपणही या ऐतिहासिक विश्व महासंमेलनाचा भाग व्हा, संत नामदेव महाराजांच्या विचारांची मशाल घेऊन समाजजागृतीचा दीप प्रज्वलित करा हा विचार प्रसादाच्या माध्यमातून घेऊन सर्व पदाधिकारी धन्य झाले.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.












































































