निरपेक्षपणे निव्वळ मुलांसाठी काम करणाऱ्या देशभरातील एका व्यक्तीला चिल्लर पार्टीतर्फे पुरस्कार…
कोल्हापूर – चित्रपट आणि मालिकांमुळे समाजमनावर होणारा वाईट परिणाम लक्षात घेऊन १२ एप्रिल २०१२ रोजी शाळेतील मुलांना मुलांसाठी तयार झालेले जगातील उत्तमोत्तम चित्रपट दाखवण्याची चळवळ सुरु केली, त्याला १२ एप्रिल २०२४ या दिवशी १२ वर्षे पूर्ण झाल्याने एका तपपूर्तीचा आनंदोत्सव झाला आहे. यानिमित्ताने या वर्षात निरपेक्षपणे निव्वळ मुलांसाठी काम करणाऱ्या देशभरातील एका व्यक्तीला चिल्लर पार्टीतर्फे पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती कला शिक्षक म्हणून कार्यरत मिलिंद यादव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत मिलिंद यादव यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाला मिळालेल्या मुलांच्या प्रतिसादामुळे पुढे दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात दर महिन्याच्या चौथ्या रविवारी सकाळी दहा वाजता मोठ्या पडद्यावर मोफत चित्रपट दाखवण्यास सुरुवात झाली. गेल्या बारा वर्षात मुलांच्या विविध कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच वाड्या वस्त्यावरील मुलांमध्ये प्रबोधन करीत ही चळवळ कोल्हापूरसह विविध जिल्ह्यातही विस्तारत आहे. इतका प्रदीर्घ काळ सुरु असलेल्या या संस्थेचे गमक लहान मुलांना सिनेमा दाखवण्याचे निर्व्याज्य काम आणि चळवळीतील सदस्यांचे एकमेकांवर असलेल्या अढळ विश्वासाचे नाते हेच आहे. चिल्लर पार्टीच्या माध्यमांतून २०१२ पासून आतापर्यंत सुमारे ८५ हजार मुलांना विविध भाषेतील बाल चित्रपट दाखवले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील दुर्गम डोंगर परिसरातील वाड्यावस्त्यांतील १०० शाळा तसेच महानगरपालिका क्षेत्रातील ५६ शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
नगरपालिका शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, झोपडपट्टीतील मुलं अशी तळागाळातील मुलांना या चळवळीच्या प्रवाहात आणण्यासाठी गेली ७ वर्षे दोन दिवसांच्या ‘बाल चित्रपट महोत्सवाचे’ आयोजन केले. केवळ महानगरपालिकेच्या शाळेतील प्रत्येक वर्षी तीन हजार म्हणजे २१ हजार मुलांनी या चित्रपटांचा आस्वाद घेतला. शिवाय शहरापासून दूर दुर्गम, जंगल भागातील वस्त्यांवरील मुलांनी मोठा पडदा पहावा, शहराची ओळख व्हावी, सिनेमागृह, शाहू महाराजांच्या वास्तू पाहाव्यात म्हणून तीन वर्षे एका एका तालुक्यातील ३०० ते ४०० मुलांना कोल्हापुरची सफर घडविली. आता गेल्या दोन वर्षात दाजीपूर आणि पिलारवाडी येथे ग्रामीण बालचित्रपट महोत्सव आयोजित केला. यंदा शाहूवाडी तालुक्यातील मुलांसाठी हा महोत्सव होईल.
याशिवाय कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात मुलांसाठी १०० हून अधिक ऑनलाईन चित्रपट, “शिनेमा पोरांचा” पुस्तकांची निर्मिती, तसेच पाणी बचत, पुस्तके खरेदी करुन वाचनाची सवय उपक्रमात अल्प दरातील सात हजार पुस्तकांची विक्री, सामान्य लोकांनी केलेल्या प्रशंसनीय कामाचा मुलांसमोर गौरव, दिवाळी दरम्यान फटाके न उडविण्याची प्रतिज्ञा, ‘फटाक्यांचे पैसे वाचवून पुस्तकांची खरेदी, गरीब मुलांना उपयोगी वस्तू असे उपक्रम पार पडले. ‘सिनेमा बनवणं सोप्पं असतं’ ही चित्रपट कार्यशाळा, मोफत संवादलेखन, अभिनय आणि सादरीकरण कार्यशाळा, कॉ. गोविंद पानसरे यांच्या जन्मदिवशी २३ नोव्हेंबरला हितचिंतकांसाठी दर्जेदार आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्याबद्दल चिल्लर पार्टीला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
विविध कार्यक्षेत्रात काम करणारे चिल्लर पार्टीचे सर्व सदस्य दरवर्षी स्वतःची रक्कम जमा करुन दानशूर व्यक्तींकडून देणगी रुपात जमा केलेल्या रक्कमेतून एक मताने आणि उत्साहाने हे उपक्रम राबवित आहेत. चिल्लर पार्टीच्या कामाला एक तप (बारा वर्षे) पूर्ण झाल्याचा आम्हा सर्व सभासदांना अभिमान आहे. आपणा सर्वांच्या सदिच्छा व आर्थिक सहकार्य यामुळेच ही वाटचाल सुकर झाली. या पत्रकार परिषदेस मिलिंद यादव, मिलिंद नाईक, ओंकार कांबळे, पद्मश्री दवे, सुधाकर जाधव, अभय बकरे उपस्थित होते.