बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत निधी मंजूर…
कोल्हापूर – लहान गावांत आणि ग्रुप ग्रामपंचायतींना अद्यापही स्वत:ची इमारत नसल्याने त्या खाजगी जागेत कार्यरत आहेत. यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार करताना अनेक अडचणी येतात. यामुळे ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत असावी याकरीता बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत राधानगरी तालुक्यातील 11, भुदरगड 17 व आजरा तालुक्यातील 9 अशा 37 ग्रामपंचायतीच्या इमारती बांधणेसाठी 7 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला सल्याची आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाहीत अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी राज्य सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू केलेल्या मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेला मंजूरी दिली आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची आवश्यकता व त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या स्त्रोतांची मर्यादा विचारात घेऊन राज्य सरकारने राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारती नाहीत अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी ‘बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री’ ग्रामपंचायत बांधणी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. ग्रामविकास विभागाच्या दि.26 फेब्रुवारी, 2024 रोजी झालेल्या शासननिर्णयानुसार सदर ग्रामपंचायतींना मंजूरी मिळालेली असून लवकर या ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाला सुरवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याकामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या योजनेतंर्गत राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटण, फेजिवडे, तळगाव, खिंडी व्हरवडे, कपिलेश्वर, कासारवाडा, ऐनी, फराळे, पिरळ, कुडूत्री, धामोड या 11 गावांचा समावेश आहे. भुदरगड तालुक्यातील पारदेवाडी, दोनवडे, टिक्केवाडी, मिणचे बुद्रुक, दारवाड, करडवाडी, निष्णप, आंबवणे, पळशिवणे, बेगवडे, नागणवाडी, देऊळवाडी, कोनवडे, नवरसवाडी, कलनाकवाडी, पाळ्याचाहुड्डा, शिवडाव या 17 गावांचा समावेश आहे. आजरा तालुक्यातील हाजगोळी बुद्रुक, खेडे, चांदेवाडी, कोरीवडे, साळगांव, हाळोली, पेरणोली, वेळवट्टी, गवसे या 9 गावांचा समावेश आहे.