अश्विनी रविंद्र
वेडेपणा करायला मुहूर्त नसतो… जिनिलिया-रितेश देशमुख लवकरच करणार मोठा धमाका! अभिनेता रितेश देशमुखने चाहत्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्याची ही घोषणा म्हणजे चाहत्यांसाठी जणू दिवाळी गिफ्टच आहे. रितेशचा बहुचर्चित सिनेमा ‘वेड’ कधी प्रदर्शित होणार हे त्याने जाहीर केले असून यातील एक सरप्राइजही त्याने पोस्टरद्वारे सांगितलं आहे. हे सरप्राइज म्हणजे जिनिलिया या सिनेमाद्वारे तिच्या मराठी सिनेमातील डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. या सिनेमाची आणखी एक खासियत म्हणजे ‘वेड’ सिनेमातून रितेश देशमुख दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.
-
रितेशने ही पोस्ट शेअर करताना म्हटले आहे की, ‘वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण केलेला वेडेपणा एखाद्या मुहूर्तावर जाहीर करायला काय हरकत आहे! आज दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छांसकट सादर करतोय तारिख आणि चित्रपटाचा फर्स्ट लूक. आमचं #वेड तुमच्यापर्यंत येतंय ३० डिसेंबरला तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असू द्या.’
रितेश आणि जिनिलियाने या सिनेमाचे एकूण तीन पोस्टर शेअर केले आहेत. या तिन्ही पोस्टरमधून ‘वेड’ची कहाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पोस्टरवरुन ही कथा प्रेम आणि विरहाची असावी असा अंदाज लावला जात आहे. दरम्यान नेमकं कथानक काय असेल हे ३० डिसेंबर रोजीच समजेल.