रानभाजी महोत्सव राज्यस्तरावर आयोजित व्हावा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

व्ही .टी .पाटील स्मृती भवन मध्ये जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धा

कोल्हापूर – पावसाळी कालावधीत केवळ डोंगरदऱ्यात उगवणाऱ्या या रानभाज्या निरोगी आयुष्य तसेच जीवनशैलीसाठी पण त्या अत्यंत उपयुक्त आहेत .या रानभाज्यांचा महोत्सव केवळ जिल्हास्तरावर न होता तो राज्यस्तरावरही साजरा करण्यात यावा अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली. राजारामपुरीतील व्ही .टी .पाटील स्मृती भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धा सन 25-26 उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते . यावेळी व्यासपीठावर विभागीय कृषी सह संचालक बसवराज मास्तोळी, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी तथा आत्म्याचे प्रकल्प संचालक जालिंदर पांगरे, अधिक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी, रानभाज्या तज्ज्ञ डॉ. शहाजी कुरणे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, या रानभाज्यात पौष्टिकता, सात्विकता आणि आरोग्यवर्धक गुण असतात मात्र याला हवे तसे मार्केटिंग मिळत नसल्याची खंत व्यक्त करून या रानभाज्यांचा हॉटेल व्यवसाय कसा सहभाग नोंदविता येईल, या संदर्भात आपण लवकरच जिल्ह्यातील हॉटेल असोसिएशन बोलू अशी ग्वाही दिली. हा रान भाजी महोत्सव कोल्हापूरसह सांगली, सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्याचे सांगून सुमारे दीडशे महिला बचत गटांनी यामध्ये सहभाग नोंदवून , साडे चारशेहून अधिक विविध प्रकारच्या खाद्य कलाकृती निर्माण केल्याचे बसवराज मास्तोळी यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी रानभाजी मांडणी स्पर्धेत निता पडवळ (प्रथम), कुडूत्री (राधानगरी) येथील संघटीत महिला बचत गट (द्वितीय), कातळी येथील कविता जाधव यांना (तृतीय) तर पिरळ – राधानगरी येथील शितलाम महिला बचत गटास उत्तेजनार्थ त्याचबरोबर पाककृती स्पर्धेत राधानगरी येथील पूजा पाटील (प्रथम), हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील शोभादेवी पाटील (द्वितीय) तर कदमवाडी येथील तुळजाभवानी महिला बचत गटाच्या राणी कदम यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.

परिक्षक म्हणून श्रीमती अश्विनी भोसले , दिपाली मस्के, पल्लवी दुधाणे , जयश्री हावळे, दिपाली सुतार, शितल जाधव यांनी काम पाहिले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते, ‘रानभाजी माहिती पुस्तिका’ प्रकाशित करण्यात आली. दि 9 ऑगस्ट रोजी म्हैसूर -बेंगलोर या ठिकाणी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त अशा जिल्हयातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजीत करण्यात आला होता. या दौऱ्याच्या यशस्वी पूर्ततेनिमित्त सहभागी शेतकऱ्यांकडून पालकमंत्री आबिटकर यांचा विशेष सत्कार या महोत्सवामध्ये करण्यात आला.

या देखण्या रानभाजी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालकमंत्री श्री आबिटकरांनी, विभागीय सह संचालक बसवराज मास्तोळी आणि आत्माचे प्रकल्प संचालक जालिंदर पांगरे यांचे विशेष कौतुक केले. यावेळी संदीप देसाई, अरुण भिंगारदिवे ,संतोष पाटील, डॉ गणेश मित्ते यांच्यासह उमेद, आत्मा आणि कृषि विभागाचे इतर अधिकारी – पदाधिकारी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.