कोल्हापूरच्या तेजस्विनी कदमची सलग दुसऱ्यांदा भारतीय स्केटिंग संघात निवड
कोल्हापूर: रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाने दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या २०व्या एशियन अजिंक्यपद रोलर स्केटिंग स्पर्धा २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
या संघात कोल्हापूरच्या तेजस्विनी रामचंद्र कदम हिची निवड झाली आहे.ती डॉ. बापूजी साळुंखे स्केटिंग प्रशिक्षण केंद्र व फोर्ट इंटरनॅशनल अकॅडमी, नागाळा पार्क येथील क्रीडा शिक्षिका आहे.विशेष म्हणजे, तेजस्विनीची ही सलग दुसरी वेळ भारतीय संघात निवड झाली आहे.
या स्पर्धा २२ ते ३१ जुलै २०२५ दरम्यान जीसॉन, दक्षिण कोरिया येथे पार पडणार आहेत.संघाची घोषणा अध्यक्ष तुळशीदास अगरवाल, उपाध्यक्ष पी.के. सिंग, सचिव नरेश शर्मा आणि संदीप भटनागर यांच्या समितीने केली.
भारतीय संघ २१ जुलै रोजी दिल्लीहून कोरियासाठी रवाना होणार आहे.तेजस्विनीने इटली येथे २०२४ मध्ये झालेल्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं.या स्पर्धेत तिने कांस्य पदक मिळवलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तिला “उत्कृष्ट खेळाडू” म्हणून गौरवण्यात आलं.
तिने १६ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची कमाई केली आहे.या निवडीच्या निमित्ताने दसरा चौक, कोल्हापूर येथे तिचा सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी ॲड. धनंजय पठाडे, अध्यक्ष अनिल कदम, अण्णा वारके, शिल्पा वनकुंद्रे (प्रिन्सिपल), शांताबाई अभिमन्यू कदम, ॲड. कृष्णराज नलवडे, अंबिका पाटील, रामचंद्र कदम, आसनी तावडे, रुपाली चिकोडीकर उपस्थित होते.तेजस्विनीला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा सौ. शुभांगी गावडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
तिला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रा. डॉ. महेशअभिमन्यू कदम आणि राष्ट्रीय कोच भास्कर अभिमन्यू कदम यांचे प्रशिक्षण लाभले आहे.