रत्नागिरी नगर परिषदेत लाड-पागे समिती सफाई कामगारांना कायम नियुक्तीपत्र : उदय सामंत यांच्या हस्ते ऐतिहासिक पाऊल
रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रत्नागिरीत नगर परिषदेअंतर्गत लाड-पागे समितीतील सफाई कामगारांच्या वारसांना कायम नियुक्तीपत्र वाटपाचा ऐतिहासिक निर्णय अमलात आणण्यात आला आहे. नगरविकास विभागाचे प्रभारी तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते हा विशेष कार्यक्रम पार पडला.
“आजचा दिवस रत्नागिरीसाठी आणि सामान्य सफाई कामगारांच्या न्यायासाठी अत्यंत ऐतिहासिक आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या धोरणात्मक निर्णयामुळे कोणत्याही जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन रत्नागिरीतील सफाई कामगारांना न्याय मिळतोय. सफाई ही फक्त नोकरी नाही, तर ती शहरसेवा आहे. स्वच्छता, आधुनिक तंत्रज्ञान आणि कामगारांचा सन्मान यांचा संगम रत्नागिरीत साकारतो आहोत,” असे ना. सामंत यांनी सांगितले.
या कार्यक्रमात २० पेक्षा जास्त कुटुंबांना नियुक्तीपत्र देण्यात आली. “तुमच्या आईवडिलांनी रत्नागिरीसाठी दिलेल्या सेवेमुळेच ही संधी मिळाली आहे. ती प्रामाणिकपणे पार पाडा, ही नोकरी हक्काची असली तरी त्यामागे सेवा, समर्पण आणि कर्तव्यभावना असावी,” असे ना. सामंत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, बंड्याशेठ साळवी, शहरप्रमुख बिपिन बंदरकर तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















































