आबिटकर इंजिनीअरींग कॉलेजच्या आवारात वृक्षारोपन करताना प्राचार्य अमर चौगुले, उपस्थित शिक्षक व विद्यार्थी.
गारगोटी – प्रदूषणाच्या समस्येने सर्वत्र उग्र रूप धारण केलेले असून, पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक झाले आहे. या संबंधी समाजाला जागृत करण्यासाठी व समाजामध्ये वृक्षारोपण व संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून युवा ग्रामीण विकास संस्था गारगोटी संचलित श्री आनंदराव आबिटकर इंजिनीअरींग कॉलेजमध्ये वृक्षारोपन करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ.अमर चौगुले उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवर व कॉलेजचे विद्यार्थी यांनी वृक्षारोपण केले.
यावेळी बोलताना प्राचार्य चौगुले म्हणाले की, पर्यावरणाच्या व समाजाच्या दृष्टीने वृक्षारोपण व संवर्धन कसे महत्त्वाचे आहे याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी वृक्षलागवड महत्त्वाची आहे. केवळ वृक्ष लागवड न करता लावलेल्या वृक्षाची सुरुवातीच्या काळात योग्य ती काळजी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले. नुकताच आपण असह्य उन्हाळा अनुभवला. त्यामुळे आपल्या आजुबाजूला झाडे असणे, आजूबाजूचा परिसर हिरवागार असणे किती गरजेचे आहे, हे समजले. म्हणूनच आपल्याला जमतील तशी झाडांची लागवड केली पाहिजे आणि त्यांची काळजीही घेतली पाहिजे.
यावेळी प्राध्यापक मुरलीधर पाटील, प्राध्यापिका प्रिती पाटील, प्रा.मनोज आळवेकर, प्रा.कविता कुरळे, प्रा.तेजस्विनी कदम, प्रा.भाग्यश्री पाटील, प्रा.निकीता आबिटकर यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.