जिल्हा कोषागार कार्यालयात कोषागार दिन समारंभ…
कोल्हापूर – कोषागार विभाग हा शासकीय निधीचे व्यवस्थापन व नियोजन करणारा शासनाचा महत्त्वाचा विभाग असल्याचे मत जिल्हा कोषागार अधिकारी अश्विनी नराजे यांनी व्यक्त केले.
कोषागार दिन समारंभ जिल्हा कोषागार कार्यालयात साजरा करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, अपर कोषागार अधिकारी प्रशांत जाधव, सुजाता सोळणकर, सरिता देमण्णा तसेच जिल्ह्यातील विविध विभागांचे वित्त विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सर्व विभागांना विविध योजनांसाठी शासनाकडून मंजूर करण्यात आलेला निधी व वेतन भत्त्यांची देयके मंजूर करण्याचे काम कोषागार कार्यालयामार्फतच करण्यात येते.
शासकीय कार्यालयाकडून प्राप्त होणाऱ्या विविध लेखाशिर्षाखाली विविध प्रकारची देयके पारित करुन ती ऑनलाईन वितरीत करणे, विविध लेखाशिर्षनिहाय जमा होणाऱ्या रकमांचे दैनंदिन स्वरुपात एकत्रिकरण करण्याचे कामही या कार्यालयामार्फत करण्यात येते. विविध देयकांमध्ये आढळणाऱ्या त्रुटींची पूर्तता करण्याचे कामही या कार्यालयाकडून केले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील 35 हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा सेवानिवृत्ती वेतन लाभ या कार्यालयामार्फत दिला जात असल्याचे श्रीमती नराजे यांनी यावेळी सांगितले.
सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर बाबींवर खर्च होणारी देयके अदा करण्याचे काम कोषागार कार्यालयामार्फत करण्यात येत असून कोषागार विभाग हा सर्व शासकीय कार्यालयांचा कणा असल्याचे मत यावेळी पोलीस उप अधीक्षक सुवर्णा पत्की यांनी व्यक्त केले.
आनंदी जीवनासाठी तडजोड वृत्ती जोपासा डॉ. दिलीप पटवर्धन
आनंदी जीवन जगण्यासाठी भूतकाळ व भविष्यकाळाचा विचार बाजूला ठेवून वर्तमानात जगा. कुटुंब टिकण्यासाठी दैनंदिन जीवनात प्रत्येकाने तडजोड वृत्ती जोपासणे आवश्यक असल्याचा मूलमंत्र व्याख्याते डॉ. दिलीप पटवर्धन यांनी दिला. प्रास्ताविक अपर कोषागार अधिकारी सरिता देमण्णा यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वृक्षारोपण, रक्तदान करण्यात आले. आभार अपर कोषागार अधिकारी प्रशांत जाधव यांनी मानले.






















































