अभियानाचा आदर्श राज्याने घ्यावा; आदर्श गोठा पुरस्कारार्थींना भरघोस बक्षीसे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.


कोल्हापूर: आजवर कोल्हापूर जिल्ह्यात सुरु झालेले अनेक उपक्रम राज्यात राबवले गेले आहेत. दूध उत्पादन वाढ व स्वच्छ दूध निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यात सुरु झालेल्या उत्कृष्ट पशुपालक, स्वच्छ व सुंदर गोठा अभियानाचा व आदर्श गोठा पुरस्काराचा आदर्श राज्यभरातील पशुपालकांनी घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करुन जिल्हा स्तरावर अनुक्रमे 41, 31 व 21 हजारांचे तर तालुका स्तरावर 21, 15 व 10 हजारांचे बक्षीस देण्यात असून सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा

उत्कृष्ट पशुपालक, स्वच्छ व सुंदर गोठा अभियानाचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शुभारंभ व आदर्श गोठा पुरस्कारांचे वितरण

* जिल्हा स्तरावर 41, 31 व 21 हजारांचे तर तालुका स्तरावर 21, 15 व 10 हजारांचे देण्यात येणार बक्षीस

* आदर्श गोठा अभियानाच्या धर्तीवर आता ‘स्वच्छ सुंदर घर अभियान’

* मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या कामाचे केले कौतुक.

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत दूध उत्पादन वाढीसाठी व स्वच्छ दूध निर्मिती प्रोत्साहनासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उत्कृष्ट पशुपालक, स्वच्छ व सुंदर गोठा अभियानाचा शुभारंभ व आदर्श गोठा पुरस्कार सन 2024 – 25 चा वितरण सोहळा सर्किट हाऊस येथील राजर्षी शाहू सभागृहात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. महेश शेजाळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, सहायक आयुक्त डॉ. सॅम लुद्रीक, कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे आदी उपस्थित होते. सर्व तालुक्यातील पुरस्कार प्राप्त 12 पशुपालकांना पालकमंत्री  आबिटकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र पुरस्काराच्या रुपाने देण्यात आले.

 

पालकमंत्री आबिटकर म्हणाले, जिल्ह्यातील अर्थकारणाचा महत्त्वाचा उद्योग दुग्ध व्यवसाय असून दुग्ध उत्पादन करणाऱ्यांचा सन्मान केला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होत असून हे उत्पादन स्वच्छ व दर्जेदार पद्धतीने होण्यासाठी आदर्श गोठा तयार होणे आवश्यक आहे. आदर्श गोठा पुरस्कारार्थींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील पशु पालकांनी आदर्श गोठे तयार करावेत व राज्यात आदर्श निर्माण करावा, असे आवाहन करुन आदर्श गोठा अभियानाच्या धर्तीवर आता जिल्हा परिषदेच्या वतीने ‘स्वच्छ सुंदर घर अभियान’ राबवण्यात येणार असून या अभियानातही जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

पालकमंत्रीआबिटकर म्हणाले, लंपी रोगाच्या मागील लाटेत या रोगामुळे जिल्ह्यात पशुधनाची हानी झाली होती. सध्या शेजारच्या जिल्ह्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असून या रोगाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील जनावरांना हानी पोहोचू नये, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म नियोजन करावे, असे त्यांनी सांगून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषदेत राबवल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले.

जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना कृषी विषयक ज्ञान मिळावे यासाठी शेतकऱ्यांचा परराज्यात अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला असून यामुळे अन्य शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळेल. हेक्‍टरी 125 टन ऊस लागवड अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यामुळे निकोप स्पर्धा निर्माण होवून जिल्ह्याच्या ऊस उत्पादनात वाढ होण्याबरोबरच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधली जाईल, असे सांगून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

आदर्श गोठा पुरस्कार 2024 – 25 चे पुरस्कार प्राप्त पशुपालक यांची नावे पुढील प्रमाणे –
1. सुमित मारुती पोवार, वाघापूर, तालुका भुदरगड
2. पांडुरंग आनंदा नाईकवाडे, पंडेवाडी, तालुका राधानगरी
3. आनंदा शिवाजी देसाई, तेरणी, तालुका गडहिंग्लज
4. कृष्णा ईश्वर पाटील, ढोलगरवाडी, तालुका चंदगड
5. मायाप्पा देवल चिगरे, टाकळीवाडी, तालुका शिरोळ
6. धनाजी बबन पाटील, भुयेवाडी, तालुका करवीर
7. संदिप एकनाथ पोवार, सिध्दनेर्ली, तालुका कागल
8. शिवाजी शामराव वडींगेकर, कातळेवाडी, तालुका शाहुवाडी
9. यशंवत कृष्णा पाटील, मांडुकली, तालुका गगनबावडा
10. निलेश शशिकांत फाटक, जंगमवाडी, तालुका हातकणंगले
11. नानासो दत्तात्रय पाटील, वाघवे, तालुका पन्हाळा
12. लता उत्तम रेडेकर, पेद्रेवाडी, तालुका आजरा

मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. म्हणाले, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकमंत्री आबिटकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या वतीने अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. लंपी रोगप्रतिबंधक लसीकरण चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात राबवल्यामुळेच या रोगावर नियंत्रण ठेवण्यात यश आले असून जळीतग्रस्त जनावरांना अनुदान राज्यात केवळ कोल्हापूर जिल्ह्यात दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्वच्छ व सुंदर गोठा अभियानंतर्गत रोख पारितोषिकाची तरतूद करणारी केवळ कोल्हापूर जिल्हा परिषद असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकातून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर यांनी या अभियानाबाबत माहिती दिली. या अभियानामुळे प्रेरणा घेऊन युवकांना दुग्ध व्यवसायाबद्दल प्रोत्साहन मिळावे व गोठ्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन स्वच्छ व दर्जेदार दूध निर्मिती व्हावी. तसेच मानव आणि पशुधनाच्या आरोग्याबरोबरच गोठ्याची फवारणी व स्वच्छतेमुळे पर्यावरणाचा समतोल साधला जाईल, असे त्यांनी सांगितले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.