20 व 21 ऑक्टोबरला शिवाजी स्टेडिअमवर आयोजन 500 हून अधिक खेळाडूंनी केले संचलन…
कोल्हापूर – भारतीय युद्धकला सादर करणारे राज्यभरातून आलेले 500 हून अधिक खेळाडू आणि त्यांनी दिलेल्या “जय भवानी जय शिवाजी” या घोषणांनी कोल्हापूर दुमदुमून गेले.. शाही दसरा कोल्हापूरचा या महोत्सवा अंतर्गत भारतीय युद्धकला व मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिक स्पर्धा कोल्हापुरात शुक्रवार दिनांक 20 व 21 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. यात सहभागी खेळाडूंचे आज संचलन झाले. कोल्हापुरात अनुभवता येणाऱ्या या थरारक स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी दिलेल्या घोषणांनी परिसरात चैतन्य पसरले.
मर्दानी खेळ व भारतीय युद्धकला प्रात्यक्षिक स्पर्धा या कोल्हापूर मधील छत्रपती शिवाजी स्टेडिअम येथे शुक्रवार दिनांक 20 व 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते 11.30 व सायंकाळी 4 ते 7.30 या वेळेत होणार आहेत. या स्पर्धांमध्ये 40 संघ सहभागी होणार असून यात एक हाती, दोन हाती, संघात्मक, लढत व कसरत कवायत या प्रकारातील खेळ खेळले जाणार आहेत. यातील पाचही विभागात एकूण 10 प्रकार खेळाडू खेळतील.
कोल्हापुरात होणाऱ्या या मर्दानी खेळांच्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्रातील स्पर्धकांचे संचलन मिरजकर तिकटी येथून सुरु झाले. यानंतर बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरुन बिंदू चौकात येऊन संचलनाची सांगता झाली.
राज्य शासनाचा पर्यटन विभाग व जिल्हा नियोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शाही दसरा महोत्सवांतर्गत या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये 500 हून अधिक मावळे आणि रणरागिनी सहभागी होणार आहेत, अशी माहिती या स्पर्धांची माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत युद्धकला स्पर्धा संयोजन समितीचे पंडित पोवार व नाना सावंत यांनी दिली. यावेळी शाही दसरा संयोजन समितीचे सुखदेव गिरी व उदय गायकवाड उपस्थित होते.