सलग आठ तास २५ मिनिटांचा विक्रम….गोविंद गावडेचे तबल्यावर हात थिरकले! मनं जिंकले..

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
 ग्लोबल व एशिया पॅसिफिक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
कोल्हापूर – श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा बारावी (सायन्स)चा विद्यार्थी कुमार गोविंद बाबुराव गावडे याने तबल्यावर सलग ८ तास २५ मिनिटे वादन करून अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित केला आहे. हा कार्यक्रम ११ ऑगस्ट रोजी विवेकानंद कॉलेजमधील शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन येथे पार पडला.
सकाळी ८ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन आंबोलीचे माजी सरपंच प्रकाश दत्ताराम गवस यांच्या हस्ते झाले. वृषाली खोत, लिंगराज गावडे (चंदगड) यांची विशेष उपस्थिती होती. दिवसभर शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी गोविंदला प्रोत्साहन देत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची नोंद ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड व एशिया पॅसिफिक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाल्याची घोषणा निरीक्षक प्रा. डॉ. महेश अभिमन्यू कदम यांनी केली. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, श्री सत्यजित (नाना) कदम, प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे यांच्या हस्ते गोविंदला दोन्ही संस्थांच्या ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांनी केले. त्यांनी गोविंद हा शिक्षण व खेळात प्राविण्य मिळवलेला असून, या विक्रमामुळे तो एक उत्कृष्ट कलाकार म्हणूनही नावारूपास आला असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुणे श्री. सत्यजित कदम यांनी “हा विक्रम शाहूरायांच्या कलानगरीची ओळख अधिक उजळवणारा आहे” असे गौरवोद्गार काढले व यापुढील वाटचालीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी “ज्ञान, विज्ञानाबरोबरच कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेतर्फे अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, त्यातूनच गोविंदने आज नवा इतिहास रचला आहे” असे नमूद केले.
विशेष म्हणजे, गोविंद हा गावडे कुटुंबीयांनी अनाथाश्रमातून अवघा तीन महिन्यांचा असताना दत्तक घेतलेला मुलगा आहे. समाजासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने त्याचे आई-वडील बाबुराव व सौ. सविता गावडे यांनी प्रेम, जपणूक आणि संस्कार देत त्याला वेगळे स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला. हा विक्रम त्यांच्या सामाजिक संदेशालाही अधोरेखित करणारा ठरला.
कार्यक्रमाला आंबोलीहून प्रकाश विठ्ठल गावडे (IAS अधिकारी, रत्नागिरी), संजय गावडे (तलाठी, सावंतवाडी), पुंडलिक पडवळ, संतोष पालेकर, बाळकृष्ण गावडे तसेच मेनन अँड मेनेनचे कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. नंदीनी शिंदे, सौ. ज्योती गडगे व सौ. पल्लवी हवालदार यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुपरवायझर असिफ कोतवाल यांनी केले.
छायाचित्र:-विक्रमवीर तबलावादक गोविंद गावडे याला ग्लोबल बुक व एशिया पॅसिफिक बुकचे प्रमाणपत्र व ट्रॉफी देताना संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य कुमार साळुंखे श्री. सत्यजित उर्फ (नाना) कदम. प्राचार्या सौ.शुभांगी मुरलीधर गावडे.  रेकॉर्ड बुकचे निरीक्षक प्रा. डॉ. महेश अभिमन्यू कदम. प्रा. असिफ कोतवाल.*

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.