सहकार क्षेत्रातून ग्रामीण अर्थव्यवस्था गतिमान करीत कृषी समृद्धी – पंकज भोयर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

सहकार क्षेत्रातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक गतिमान करीत कृषी समृद्धी साधणारराज्यमंत्री पंकज भोयर

कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारभाव संपूर्ण राज्याला दिशादर्शक

सेवा सोसायट्यांचे संगणकीकरण आणि गटसचिवांच्या सक्षमीकरणाबाबत कार्यशाळा

कोल्हापूर : सहकारी संस्था टिकल्या तर तळागाळापर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करता येईल. सहकार क्षेत्रातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक गतिमान करीत कृषी समृद्धी साधण्यासाठी अनेक निर्णय केंद्र व राज्य शासनाकडून घेण्यात आले. याचाच भाग म्हणून ग्रामीण भागातील सहकारी सेवा संस्था अधिक सक्षम करण्यासाठी संस्था नियुक्त सचिवांना जिल्हा देखरेख सहकारी संघामध्ये समाविष्ट करण्याबाबत शासन निर्णय काढण्यात आला असल्याचे प्रतिपादन सहकार, गृहनिर्माण, शालेय शिक्षण व खनिकर्म राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केले. त्यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे विकास सेवा सोसायट्यांचे संगणकीकरण आणि केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने गटसचिवांची कार्यशाळा संपन्न झाली, त्या वेळी ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, सहकार क्षेत्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कामांबाबत खूप ऐकले असून या जिल्ह्यातील सहकारभाव संपूर्ण राज्याला दिशादर्शक ठरत आहे. येथील सहकारातील कर्ज पुरवठा, नाविण्यपूर्ण उपक्रम, विविध व्यवसायांची सेवा सोसायट्यांना दिलेली जोड, कर्ज वसुली अशा अनेक बाबी सहकार क्षेत्राला नव्या उंचीवर नेवून ठेवत आहेत.

या कार्यशाळेला आमदार अमल महाडिक, कोल्हापूर विभागाचे सहनिबंधक सहकारी संस्था डॉ. महेश कदम, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि सेवा सोसायट्यांचे गटसचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यमंत्री म्हणाले, ग्रामीण विकास सोसायट्या अधिक सक्षम करण्यासाठी ५० हून अधिक वेगवेगळे व्यवसाय त्यांना जोडले गेले आहेत, तसेच महिलांना सोसायट्या दिल्या जात आहेत. येत्या काळात पेट्रोल पंपही दिले जाणार आहेत. अशा प्रकारे सहकारातून समृद्धी साधण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. ग्रामीण भागातील अर्थकारणाला गती देण्याचे काम सेवा सोसायट्यांच्या गटसचिवांनी केले आहे. त्यांना अधिक सक्षम केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्ताने देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने स्वतंत्र सहकार खात्याची स्थापना झाली आहे. देशातील सर्व विकास सेवा सोसायट्यांचे पारदर्शी आणि गतिमान कामकाजासाठी संगणकीकरणाचे कार्य हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत राज्यातील ६० ते ६५ टक्के सेवा सोसायट्यांचे संगणकीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहे. याचबरोबर त्यांनी प्रत्येक सहकारी सेवा संस्थेने ’एक पेड माँ के नाम‘ या अभियानात सहभाग नोंदवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाच्या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन केले.

आमदार अमल महाडिक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सहकाराची पंढरी म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. या जिल्ह्याचा आदर्श घेऊन देशभर सहकार चळवळीची वाटचाल सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गटसचिवांची संख्या वाढवून एका सचिवाकडे असलेला दोन ते पाच गावांचा ताण कमी करण्याची मागणी त्यांनी केली. सचिवांच्या योगदानातून गावांना आर्थिक समृद्धी मिळत आहे. सुरू असलेल्या संगणकीकरणात लवकरच जिल्हा शंभर टक्के काम पूर्ण करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

प्रास्ताविकात कोल्हापूर विभागाचे सहनिबंधक सहकारी संस्था डॉ. महेश कदम यांनी विभागातील सहकारविषयक माहिती दिली. कोल्हापूर जिल्ह्याचे सहकारविषयक योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. सेवा सोसायट्यांना अधिक सक्षम करण्यासाठी या कार्यशाळेतून संगणकीकरण आणि केंद्रीय योजनांची माहिती दिली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी सादरीकरणातून जिल्ह्यातील सहकारविषयक आकडेवारी आणि यशकथा मांडल्या. ते म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आता प्रगत सहकार जिल्हा म्हणून होत आहे. प्रत्येक घरात सहकार पोहोचवण्याचे काम सेवा सोसायट्यांनी केले आहे. कर्जपुरवठ्यात सहकार क्षेत्राचा वाटा ६५ टक्के आहे, जो राज्यात सर्वाधिक आहे. आता पारंपरिक काम बंद करून अधिक पारदर्शी आणि गतिमान काम करण्यासाठी सर्व सोसायट्या संगणकीकृत करण्यात येत आहेत. पुढील पंधरा दिवसांत सर्व सेवा सोसायट्या संगणकीकृत होतील, असेही त्यांनी सांगितले. कार्यशाळेची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. मान्यवरांचे स्वागत जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद ओतारी यांनी केले, तर आभारप्रदर्शन उपनिबंधक डॉ. प्रिया दळणकर यांनी केले.

जिल्ह्यातील सहकारविषयक कामकाजाची संख्यात्मक आकडेवारी
जिल्ह्यात एकुण 13413 सहकारी संस्था आहेत. यात प्रामुख्याने विविध कार्यकारी सहकारी संस्था 1958, सहकारी पतसंस्था 1419, दुग्ध संस्था 6329 तर नागरी सहकारी संस्था 41, गृहनिर्माण संस्था 630, मजूर संस्था 322 आहेत. 1958 विकास संस्थांमध्ये 901 सचिव संख्या आहे. तसेच 1958 मधील 26 संस्थांकडे 26 कोटींपेक्षा जास्त खेळते भांडवल आहे. 113 संस्थांकडे 1 ते 10 कोटींचे भांडवल आहे. यातील संगणीकृत काम सुरु असलेल्या 1751 संस्था आहेत. जन औषधी केंद्र 6 संस्थांमार्फत सुरु आहे. जिल्ह्यात धान्य साठवण गोदामे 504 असून 1 लाख 94 हजार मे.टन क्षमता आहे.सीएससी सेंटर सुरु केलेल्या 1155 संस्था आहेत. प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र सुरू केलेल्या 82 संस्था आहेत. 1955 मधील एक व्यवसाय सुरु केलेल्या 1240 संस्था आहेत, दोन व्यवसाय 245 संस्थांनी तर तीन पेक्षा जास्त व्यवसाय सुरु केलेल्या 151 संस्था आहेत.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.