सुभेदार ..
निष्ठा म्हणजे सुभेदार….त्याग म्हणजे सुभेदार….वचन म्हणजे तानाजीराव मालुसरे..! अंगावर धाडसाचा काटा आणणारी कलाकारांची अदाकारी अन् ह्दयात कोरून ठेवणारे संवाद म्हणजे ‘सुभेदार’ !
‘सुभेदार’ हा महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासाला पुन्हा एकदा गवसणी घालून नव्या पिढीत एक धमक तयार करणारा चित्रपट म्हणावा लागेल. शिवचरित्रातील पाचवे पुष्प म्हणजे ‘सुभेदार’ पडद्यावर पाहताना डोळय़ाची पापणी सुद्धा हलत नाही. मनात ऊर्जा निर्माण करत डोक्यात निष्ठा, त्याग आणि वचन हा विचार घेऊन प्रेक्षक बाहेर पडतो. पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका साकारताना चिन्मय मांडलेकर यांनी दाखवलेला करारी बाणा अन् जिजाऊंच्या भुमिकेत दिसणाऱ्या मृणाल कुलकर्णी यांच्या नजरेतील बाणेदारपणा प्रत्येकाच्या डोळय़ात साठवला जातो.

शिवचरित्रात पदोपदी दिसणारी सहयाद्रीच्या कडेकपारीतल्या रांगडय़ा, विश्वासू मावळ्य़ांच्या पराक्रमाची गाथा प्रेरणादायी आहे. प्रेरणा देणारी ही गाथा पडद्यावर साकारताना त्या मागे किती किती कष्ट, अभ्यास आणि दूरदृष्टीचा विचार लेखक व दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी केला असावा याचा अनुभव काळजात घर करून जातो. दोन-अडीच तासांची ती भव्य कलाकृती साकारताना अगदी सहजपणा अन् प्रेक्षकाला खिळवून ठेवेल याचा नक्कीच विचार झालेला दिसतोय.
मित्र प्रेम, संघटन, दूरदृष्टी, धर्मनिरपेक्षता अशा गुणांची सजगता सिद्ध करताना सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यासह मावळय़ांनी आयुष्य कसे स्वराज्याला समर्पित केले होते हे दाखवण्याचा प्रयत्न अत्यंत यशस्वी झाला आहे.

राजं म्या शबुद देतो, तुम्हास्नी इथल्या मातीचा कणं अन् कणं स्वतंत्र राहण्यासाठी या मालुसरेच्या अंगातील रक्ताचा शेवटचा थेंबही गळंल.. !सुभेदार तानाजी मालुसरेंची भुमिका साकारणारे अजय पुरकर जेव्हा हा रांगडा विश्वास देतात, तेव्हा मनात विचारांचे काहूर माजते. शिवरायांना दिलेला शब्द पाळण्याठी सुभेदार तानाजी मालुसरेंचा जीवाची बाजी लावणारा रणसंग्राम चालू असताना, इकडे शिवराय प्रचंड अस्वस्थ आणि काळजीत दिसतात. यातून सेनापती आणि मावळय़ाच्या जगावेगळया हळव्या नात्याची जाणीव मनात खोलवर घर करून जाते.
आमच्या प्रेतांच्या पायऱ्या रचायला लागल्या तरी चालतील पण…. आऊसाहेबांचे पाय कोंढाण्याच्या दगडी पायठाणाला लागले पाहिजेत…. या शब्दांनी माँ जिजाऊंना मावळय़ांच्या मनात किती आदराचे, सन्मानाचे स्थान होते हे अगदी हुबेहूब साकारले आहे. आज आपला देश जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहिले जात असताना निष्ठा, त्याग आणि वचन पाळण्याचा आपला मराठमोळा इतिहास प्रत्येक भारतीयाच्या मनात रूजविला जाणे गरजेचे आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील न विसरता येणारे नाव म्हणजे भालजी पेंढारकर. त्यांनी ७ – ८ दशकांपूर्वी तत्कालीन परिस्थितीत शिवचरित्र पडद्यावर साकारण्याची मेहनत घेतली. आज पुन्हा दिग्पाल लांजेकर यांच्या टिमने हे शिवधनुष्य यशस्वीपणे उचलताना बॉलीवूडच्या चित्रपटांनाही मागे टाकलेय असे म्हणायला वाव आहे.
खरं तर कोणताही इतिहास पडद्यावर साकारताना तो निष्पक्ष असावा यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. ही कसरत करताना त्यावर कोणाचा प्रभाव अपेक्षित नसतो याची जाणीव ठेवून दिग्पाल लांजेकर यांनी हे भव्यदिव्य स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. खरं तरं चित्रपट हा इतिहासाची आठवण जागृत करणारा आणि भावी पिढीला आपल्या इतिहासाचा आदर्श वाटावा असा असावा. तो एकदा नव्हे, तर नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी, पराक्रमाची गाथा मनात रूजवण्यासाठी, नवे काही तरी घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा पहावा याची दखल दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी घेतली आहे.
बॉलिवूडमध्ये अनेक बिग बजेट चित्रपटांचा पडद्यावर वरचष्मा असतो. तो वरचष्मा बाजूला सारून मराठी ऐतिहासिक चित्रपटाने आपले वर्चस्व निर्माण करण्याचा सुभेदारचा हा प्रयत्न प्रेक्षकांनाही भावनिक करून जातो. एखाद्या अलिशान बंगल्यात जसे मोठमोठय़ा कुंडय़ा आणि त्यातून शोभीवंत झाडे लावली जातात.. पण एखाद्या कौलारू घरासमोरील साऱ्या आसमंतात गंध पसरविणारा मोगरा, पारिजातक आपले लक्ष वेधून घेतात, अगदी तसेच या चित्रपटाबद्दल म्हणावेसे वाटते.

अपर पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण
जाता जाता एकच भावना मनात घोळत राहते की नजरेत बाणेदारपणा कायम ठेवत बालशिवाजींना घडवणाऱ्या जिजाऊ आणि वृद्धत्वाच्या काळातही आपला तोच बाणेदारपणा शिवरायांच्या पाठीशी उभा करणाऱ्या जिजाऊ आऊसाहेब….या दोन्ही पातळीवरच्या भुमिका सकारताना अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी आपल्या अभिनयाने आम्हा प्रेक्षकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. मागील काही वर्षात या साऱ्या कलाकारांसह मैत्रीचे स्निग्ध नातं रूजलं आहे. त्यामुळे त्यांची प्रत्येक कलाकृती रसिकांना सादर करताना मला आवर्जुन बोलावलं जातं. त्यांच्या कलेला दाद देताना मलाही नकळत मूठभर मांस चढते.