आ. गाडगीळ यांच्याकडून लोकार्पणस्थळाची पाहणी
सांगली प्रतिनिधी – पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवार, दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक परिसराची पाहणी केली.
सांगली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. 9 मध्ये तब्बल दीड कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या भव्य अश्वारूढ पुतळ्याची उंची 21 फूट असून वजन सुमारे 4 टन आहे. देशातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ स्वरूपातील हा एकमेव पुतळा असल्याने या स्मारकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सोहळ्याच्या अनुषंगाने परिसरातील सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, प्रकाशयोजना, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता इत्यादी कामांचा आढावा आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव आणि नागरिकांसमवेत घेतला.
यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ सर्व नागरिकांनी अनावरण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी नगरसेविका रोहिणीताई पाटील, मनोज सरगर, विष्णू माने, संतोष पाटील, मनगु आबा सरगर, अतुल माने, भोपाल सरगर, अमित देसाई, दरिबा बंडगर, सुरज मामा पवार यांच्यासह पदाधिकारी, मनपा अधिकारी, विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.












































