वितरण प्रणालीवर प्रभावी सनियंत्रण ठेवण्याच्या केल्या सूचना
कोल्हापूर – जिल्ह्यात गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सध्या वितरणांच्या ठिकाणी रांगा पाहायला मिळत आहेत. मात्र, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ आवश्यकतेनुसारच बुकिंग करावे. जिल्ह्यात दररोज ६५ हजार सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून, टंचाईची भीती न बाळगता गरज असेल तेव्हाच नोंदणी करावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.
आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या गॅस व इंधन टंचाईच्या अनुषंगाने पालकमंत्री आबिटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज, महापौर रुपाराणी निकम, आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका सदस्य आदिल फरास, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी तसेच संबंधित गॅस एजन्सीचे प्रमुख व पुरवठादार उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री म्हणाले की, लोकांमध्ये अकारण भीती निर्माण झाल्याने आणि भविष्यात टंचाई भासेल या कल्पनेने बुकिंगची संख्या वाढली असून गर्दी होत आहे. प्रशासनाने लोकांना योग्य माहिती देऊन त्यांची भीती दूर करावी. प्रशासन या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यात घरगुती गॅसचा तुटवडा नसून मुबलक साठा उपलब्ध आहे. घरगुती वापरासाठी मागणी अचानक वाढल्याने व्यावसायिक सिलेंडरच्या वितरणावर शासनाकडून काही बंधने घालण्यात आली आहेत, मात्र ही समस्याही येत्या दोन-तीन दिवसांत सुटेल. पुढील आठ दिवसांपर्यंत योग्य समन्वय ठेवून प्रभावी सनियंत्रण ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याबाबत सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सूचना दिल्या असून, नागरिकांमधील धास्ती (पॅनिक) कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असल्याचे सांगितले.
जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी बैठकीत माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यात एकूण ११२ गॅस एजन्सी असून ११.५ लाख घरगुती गॅस जोडण्या आहेत. तसेच ११ हजारांहून अधिक ग्राहकांना पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा केला जातो. मोठ्या प्रमाणात एकाच वेळी बुकिंग झाल्याने काही काळासाठी बुकिंग सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, मात्र ते आता पुन्हा पूर्ववत करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी केली जात असून, सर्व गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करण्यात येत आहे. रुग्णालये, शैक्षणिक संस्था, वृद्धाश्रम आणि अनाथालये यांसारख्या अत्यावश्यक सार्वजनिक संस्थांचा व्यावसायिक गॅस पुरवठा खंडित करण्यात आलेला नाही, तो सुरळीत सुरू आहे.
श्री अंबाबाई देवस्थान विकास आराखड्याचा आढावा
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अंबाबाई मंदिर (महालक्ष्मी मंदिर) परिसर पुनर्विकास आणि सुधारणा प्रकल्पाची उद्दिष्टे बैठकीत मांडली. यामध्ये पुरेशी पार्किंग व्यवस्था निर्माण करणे, दर्शन रांगांचे नियोजन सुधारणे आणि भाविकांच्या जेवणासाठी व विश्रांतीसाठी समर्पित ठिकाणे स्थापित करणे अशा विषयांचा समावेश होता. सादरीकरणाद्वारे प्रत्येक प्रस्तावित कामावर चर्चा करण्यात आली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले की, या आराखड्याची अंमलबजावणी सर्व घटकांच्या समन्वयातूनच केली जाईल. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना सविस्तर माहिती दिली जाईल आणि स्थानिक नागरिकांच्या सहमतीनेच सर्व निर्णय घेतले जातील. मोठ्या प्रमाणात वाहनतळांची निर्मिती आवश्यक असल्याने बैठकीत प्रस्तावित विविध जागांवर चर्चा करण्यात आली.
पोलीस विभागासाठी ७१ सुरक्षा किट्सचे वाटप
जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पोलीस विभागाच्या ७१ पोलीस ठाण्यांना सुरक्षा किट्स देण्यात येत आहेत. या किट्सचे वाटप पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास खासदार छत्रपती शाहू महाराज, महापौर रुपाराणी निकम, आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.


















































