5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ग्रँड फिनालेमध्ये टॉप 6 पैकी एक स्पर्धक इंडियाज गॉट टॅलेंटचा किताब जिंकणार!
मुंबई – ही ट्रॉफी कोण पटकावणार हे जाणून घेण्यासाठी अवश्य बघा इंडियाज गॉट टॅलेंटचा ग्रँड फिनाले 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर! या जुलै महिन्यात सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरू झालेल्या इंडियाज गॉट टॅलेंटने देशभरातील अनोखी आणि अद्वितीय प्रतिभा यशस्वीरीत्या प्रेक्षकांपुढे आणली आहे. सदाबहार अर्जुन बिजलाणीने या कार्यक्रमाची सूत्रे सांभाळली, तर किरण खेर, शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि बादशाह या मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांनी परीक्षणाचे काम केले आहे. आता या अत्यंत लोकप्रिय टॅलेंट-आधारित रियालिटी शोमध्ये टॉप 6 स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
‘विजयी विश्व हुनर हमारा’ हे आपल्या प्रतिभेतून सिद्ध करणारे हे टॉप 6 स्पर्धक आहेत – बॉलीवूड हिप-हॉप डान्सर्स- मुंबईचे झीरो डिग्री, छत्तीसगडचा एरियल मलखांब ग्रुप अबुझमाड मलखांब अकादमी, कोलकाताहून आलेला जबरदस्त डान्स ग्रूप गोल्डन गर्ल्स, ‘अॅक्रो डान्सर्स’ The ART (उत्तर प्रदेशचा अभिषेक, जयपूरचा राहुल आणि मुंबईचा तेजस), भारतीय शास्त्रीय फ्यूजन बॅंड रागा फ्यूजन (लुधियानाचा जयंत पटनाईक, मध्यप्रदेशचा अजय तिवारी, पटणाचा अमृतांशु दत्ता आणि पटणाचाच हर्षित शंकर) आणि नागालँडचा पॉवर पॅक्ड बॅंड महिला बॅंड. छत्तीसगडमधील एका छोट्याशा गावातून आलेल्या अबुझमाड मलखांब अकादमीने हे सिद्ध करून दाखवले की, कठोर परिश्रम आणि दृढनिर्धार असल्यास काहीच अशक्य नसते. खांबांचा उपयोग करून त्यांनी केलेल्या मलखांबच्या करामती पाहून परीक्षकांनी त्यांची खूप वाहवा केली.
इतकेच नाही, तर या शोमधला त्यांचा प्रवास पाहून अत्यंत प्रभावित झालेल्या किरण खेर आणि बादशाह या दोघा परीक्षकांनी तर या कला प्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या अकादमीला वित्तसहाय्य करण्याचे देखील वचन दिले. आपली वाटचाल आणि अंतिम फेरीत पोहोचल्याचा आनंद व्यक्त करताना या ग्रुपचा लीडर मनोज म्हणाला, “इंडियाज गॉट टॅलेंटच्या टॉप 6 मध्ये येणे हे आमचे स्वप्न होते, जे साकार झाले आहे. हा कठोर परिश्रम आणि निष्ठेचा प्रवास होता, ज्याला संपूर्ण देशाने पाठिंबा दिला. या भव्य मंचावर उभे राहताना आम्हाला किती कृतकृत्य वाटते आहे आणि अत्यानंद होत आहे हे शब्दांतून सांगता येणार नाही. आमचे गाव आज आमच्या नावाने ओळखले जाते आणि जगाच्या नकाशावर आमच्या गावाचा ठसा उमटवण्यासाठी या मंचाने आम्हाला मदत केली आहे. आगामी फिनालेमध्ये आम्ही आमचे सर्वस्व पणाला लावू आणि आमच्या परफॉर्मन्समधून आमच्यातील जादू लोकांपुढे सादर करू. हा अद्वितीय क्षण शक्य केल्याबद्दल धन्यवाद! फिनालेमध्ये आमचा प्रयत्न 100% असेल!”
नागालँडच्या महिला बॅंडमधल्या मुली जेव्हा ऑडिशन फेरीत गणवेशात मंचावर आल्या, तेव्हा त्यांनी सर्वांना थक्क केले आणि ‘आज की नारी, सबसे भारी’ हे सिद्ध केले. दर आठवड्याला त्यांनी सादर केलेला रॉक आणि फंक संगीत परफॉर्मन्स परीक्षक आणि आमंत्रित पाहुण्यांना देखील मंचावर जाऊन त्यांच्यासोबत ठेका धरायला लावायचा. या प्रवासाबद्दल बोलताना महिला बॅंडने सांगितले, “आम्ही सैन्यात काम करत असल्याने देशासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आम्ही कठोर परिश्रम करत असतो. इंडियाज गॉट टॅलेंटच्या माध्यमातून आम्हाला आमच्यातील प्रतिभा देशासमोर सादर करण्याची संधी मिळाली. टॉप 6 मध्ये येणे हे आमच्यासाठी स्वप्नपूर्ती सारखे आहे. सगळ्या परीक्षकांनी आणि खास करून बादशाहने प्रत्येक आठवड्यात आमच्या गाण्याचे जे कौतुक केले ते आमचे प्रयत्न सार्थक करणारे होते. आम्ही ही ट्रॉफी जिंकू आणि आपल्या देशाची मान ताठ करू अशी आम्हाला आशा आहे. स्त्रियांनी जर ठरवले तर त्या आपले घर, काम हे दोन्ही समर्थपणे सांभाळून आपल्या पॅशनचा देखील पाठपुरावा करू शकतात हे आम्ही दाखवून देऊ शकलो, याचा आम्हाला आनंद आहे.”

सतत काही ना काही नावीन्यपूर्ण करणाऱ्या आणि मंत्रमुग्ध करणारे डान्स परफॉर्मन्स देणाऱ्या 40 सदस्यांच्या गोल्डन गर्ल्स या ग्रुपने अप्रतिम रचना करून सर्वांना थक्क केले. त्यांच्या परफॉर्मन्सेसने केवळ परीक्षकच नाही, तर आमंत्रित पाहुणे देखील अचंबित होत होते. आपल्या या प्रवासाविषयी बोलताना गोल्डन गर्ल्स ग्रुपमधली सुमन म्हणते, “पहिल्या ऑडिशनपासून ते भव्य फिनालेपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास म्हणजे आमच्यासाठी भावनांची एक रोलरकॉस्टर राईड होती. प्रत्येक परफॉर्मन्स आम्ही जीव ओतून केला आणि आता फिनालेमध्ये आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत केवळ अंतिम फेरीतील स्पर्धक म्हणून नाही, तर प्रतिभा आणि चिकाटी यांच्या बळावर या प्रतिष्ठित मंचावर उलगडणाऱ्या अमर्याद शक्यतांचे प्रतीक म्हणून देखील! या अविस्मरणीय प्रवासात आम्हाला साथ आणि पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार!”
‘छोटा पॅक बडा धमाका’ ही उक्ती सार्थ करणाऱ्या मुंबईच्या झीरो डिग्री या बॉलीवूड हिप-हॉप डान्सर्स ग्रुपने परीक्षकांसोबत देशातील लक्षावधी प्रेक्षकांचे हृदय देखील जिंकून घेतले. दर आठवड्याला परीक्षक आणि आमंत्रित पाहुण्यांना प्रभावित करत, विविध अंगांनी आपली प्रतिभा सादर करून एक एक पायरी चढत हे छोटे वीर आता ग्रँड फिनालेमध्ये येऊन दाखल झाले आहेत. या प्रवासाविषयी बोलताना या ग्रुपची रचना करणारा मोहम्मद मोहसीन म्हणतो, “इंडियाज गॉट टॅलेंटच्या ग्रँड फिनालेमध्ये धडक देणे हे आम्हा झीरो डिग्रीसाठी स्वप्नवत आहे. या स्पर्धेत भाग घेणे हीच मुळात आमच्यासाठी आमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेरची गोष्ट होती, कारण सुरुवातीला आम्ही फक्त आमच्या कुटुंबियांसाठी आणि मित्र-मंडळींसाठी परफॉर्म करायचो. आम्ही जेव्हा ऑडिशन दिली, तेव्हा आम्ही इथवर पोहोचू अशी कल्पनाच आम्ही केली नव्हती. प्रत्येक फेरी पार करताना आम्हाला अधिकाधिक आत्मविश्वास मिळत गेला आमच्या टीमचे सामर्थ्य बळावत गेले. इतर मुलांना आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्यासाठी कठोर परिश्रम घेण्यासाठी आमच्याकडून प्रेरणा मिळावी अशी आमची इच्छा आहे. आम्ही जिंकलो, तर आमचे आयुष्यच बदलून जाईल पण इथवर आल्यावर आम्हाला विजेते असल्यासारखेच वाटते आहे. अंतिम फेरीचा निकाल काहीही आला, तरी या प्रवासात आम्ही जो आनंद अनुभवला आहे, तो आम्ही कधीच विसरणार नाही.”
गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध डान्स मूव्ह्ज आणि अॅक्रोबॅट्स करणाऱ्या ‘तीन शरीरे पण एक मन’ असणाऱ्या The ART (उत्तर प्रदेशचा अभिषेक, जयपूरचा राहुल आणि मुंबईचा तेजस) ग्रुपने परीक्षकांना आणि खास करून शिल्पा शेट्टीला फारच प्रभावित केले. त्यांच्या जबरदस्त अॅक्रोबॅटिक मूव्ह्ज पाहून शिल्पा शेट्टीने कित्येकदा परीक्षकांच्या पॅनलवर उभे राहून त्यांचे कौतुक केले आहे. पण इतकेच नाही, तर या तीन कलाकारांनी दर आठवड्याला आपल्या अॅक्टमधून काही ना काही संदेश देखील दिला. टॉप 6 मध्ये पोहोचल्याचा आनंद व्यक्त करताना या ग्रुपचा सदस्य तेजस धुमानखेडे म्हणाला, “अजूनही हे एक स्वप्नच वाटते आहे. ऑडिशन देण्याच्या 15 दिवस आधीपासून आम्ही तयारी सुरू केली होती. शिल्पा शेट्टी कुंद्रा मॅमने आमच्या ग्रुपला नाव दिले आणि आम्ही टॉप 6 मध्ये येऊन पोहोचलो आहोत, यावर आमचा विश्वासच बसत नाहीये. आमच्या या प्रवासात खूप चढ-उतार आले, पण आम्ही हार मानली नाही. इंडियाज गॉट टॅलेंटने आम्हाला नवी ओळख दिली आहे आणि देशासमोर आमची प्रतिभा सादर करण्यासाठी भव्य मंच दिला आहे. आम्हाला आशा आहे की आम्ही ही ट्रॉफी जिंकू आणि सर्वांना आमचा अभिमान वाटेल!”
रागा फ्यूजनने (लुधियानाचा जयंत पटनाईक, मध्यप्रदेशचा अजय तिवारी, पटणाचा अमृतांशु दत्ता आणि पटणाचाच हर्षित शंकर) अनोखी आणि एकापेक्षा एक सुंदर फ्यूजन सादर करून फिनालेमध्ये प्रवेश मिळवला आहे. दरेक आठवड्यात हा ग्रूप शास्त्रीय स्पर्श देऊन, छोटी रोपे, बाटल्या यांचा वाद्यांसारखा उपयोग करून गाण्यांचे अप्रतिम फ्यूजन करत होता. या ग्रुपमधल्या अजयने त्यांच्या या प्रवासाबद्दल म्हटले, “आम्हाला ही संधी देऊन आमच्यातील सर्वोत्कृष्ट प्रतिभा बाहेर काढण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल आम्ही इंडियाज गॉट टॅलेंटचे आभारी आहोत. आम्ही ग्रँड फिनालेमध्ये पोहोचलो आहोत, याचाच अर्थ आम्ही लोकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे ज्यामुळे त्यांनी आम्हाला त्यांचे अनमोल मत दिले आहे. इतक्या भव्य मंचावर आणि माननीय परीक्षक आणि मान्यवर अतिथींच्या समोर परफॉर्म करण्याचा आमचा अनुभव अद्भुत होता. विशाल दादलानी, कुमार सानू यांनी केलेले आमचे कौतुक आणि किरण मॅमने डान्स करून आम्हाला दिलेली दाद हे या प्रवासातले काही अविस्मरणीय क्षण आहेत. खूप खूप आभार आणि आम्हाला आशा आहे की आम्ही सर्वांची मान अभिमानाने ताठ करू.”



















































