महानगरपालिका व सिद्धगिरी जननी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने गरजू कुटुंबांना अल्प दरात सल्ला व उपचार मिळणार
कोल्हापूर (विनायक जितकर) – कोल्हापूर महानगरपालिका व सिद्धगिरी जननी आय.व्ही.एफ. आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने सावित्रीबाई फुले रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘सृष्टी मोफत वंध्यत्व सल्ला केंद्रा’चे आज पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्राथमिक स्वरूपात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा वर्कर्सचा पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशासक के. मंजुलक्ष्मी, सिद्धगिरी जननी आय.व्ही.एफ. व टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या मुख्य संचालिका व विभाग प्रमुख डॉ. वर्षा पाटील, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा आदी उपस्थित होते.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, सिद्धगिरीच्या जननी हॉस्पिटल व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने गरजूंना या सेवेचा लाभ होणार आहे. सर्वांनी जीवनशैलीत बदल करणे ही आज काळाची गरज आहे. पौष्टिक आहार, नियमित व्यायाम व नैसर्गिक जीवनशैली अंगीकारल्यास अशा आजारांपासून बचाव होऊ शकतो. कोल्हापूर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग उत्तम कामगिरी करत आहे. राज्यातील अशा स्वरूपाची ही सेवा एक उदाहरण ठरणारी आहे. कोल्हापुरातील पंचगंगा व सावित्रीबाई फुले ही रुग्णालये, सी.पी.आर.नंतर नागरिकांचा विश्वास संपादन करणारी ठरली आहेत. महानगरपालिकेच्या पुढाकाराने अशा सेवा अधिक गतिमान व्हाव्यात, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी बोलताना सांगितले की, देशामध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे. प्रामुख्याने आहारातील बदल, उशिरा होणारे विवाह, बदललेली जीवनशैली ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे वंध्यत्वावर वेळेत उपचार घेणे आवश्यक झाले आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणे खर्चिक असते. मात्र महानगरपालिका व सिद्धगिरी जननी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने गरजू कुटुंबांना अल्प दरात सल्ला व उपचार मिळणार आहेत. महापालिकेची पंचगंगा व सावित्रीबाई फुले ही दोन्ही रुग्णालये समाधानकारक सेवा देत आहेत.
आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, ही सेवा इतर कोणत्याही शासकीय रुग्णालयात उपलब्ध नसून ती फक्त सावित्रीबाई फुले रुग्णालयातच सुरू करण्यात आली आहे. महापालिका अंतर्गत २ रुग्णालये व ११ नागरी सुविधा केंद्रांमार्फत सर्व राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येते. गरजू वंध्यत्वग्रस्त जोडप्यांना सल्ला व उपचार उपलब्ध होणार आहेत. या केंद्रात गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मोफत सल्ला व आय.यू.आय. उपचाराची सुविधा उपलब्ध राहणार आहे. सिद्धगिरी जननी आय.व्ही.एफ. सेंटरच्या संचालिका डॉ. वर्षा पाटील यांनी सांगितले की, महापालिकेच्या सहकार्यामुळे हे केंद्र सुरू करता आले आहे. या केंद्रामार्फत मोफत सल्ला व अत्यंत माफक दरात आय.यू.आय. उपचार सेवा उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रातील महापालिकेच्या रुग्णालयात सुरू होणारे हे पहिले केंद्र आहे.
यावेळी डॉ. विवेक हळदवणेकर, डॉ. वृषाली घोरपडे, डॉ. भूषण सुतार, उपशहर अभियंता अरुण गुजर, नोडल ऑफिसर डॉ. अमोल माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजना बागडी, डॉ. विद्या काळे-हेरवाडे, विवेक सिद्ध, सुजित पाटील, कुमार चव्हाण, प्रसाद नेवरेकर, राकेश पाटील, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.