आपापले मतदारसंघ घट्ट करा, कोणतीही शंका – कुशंका राखू नका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन…
कोल्हापूर – नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत प्रा. संजय मंडलिक यांना खासदार करण्याची खुणगाठ बांधा. त्यासाठी, कोल्हापूर शहरासह आपापले विधानसभा मतदारसंघ घट्ट करा. लोकांची मनस्थिती तयार करा. मनामध्ये कोणतीही शंका – कुशंका राखू नका, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या लढाईत सर्वांनीच मोठ्या ताकतीने आणि हिमतीने उतरावे लागेल, असेही ते म्हणाले. कोल्हापुरात मार्केट यार्डमध्ये शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रवादी, भाजपासह मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मंत्री मुश्रीफ अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, प्रा. संजय मंडलिक यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत होय. विद्यार्थी, नवमतदार, व्यापारी यांच्या मतदानाबद्दल माझ्या मनात शंका नाही. परंतु; बहुजन समाजापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रा. संजय मंडलिक यांना निवडून आणायचेच, ही शपथ घ्या. खासदार धनंजय महाडिक हे दिल्लीला गेल्यामुळे या मेळाव्याला येऊ शकले नाहीत. माजी आमदार अमल महाडिक हे सत्यजित कदम यांच्या घरातील विवाह सोहळ्यात आहेत. चंदगडचे भाजपाचे नेते शिवाजीराव पाटील हे मुंबईत असल्यामुळे ते पोहोचू शकले नाहीत, अशीही स्पष्टोक्ती त्यांनी दिली.
उमेदवार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झालेले देशातील काम. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून झालेले काम. ही आमच्याकडे सांगण्यासारखी बाजू आहे. हे कामच जनतेपर्यंत पोहोचवा. विरोधी बाजूकडे सांगण्यासारखे कोणतेही काम नाही. त्यामुळे जनता निश्चित मोठ्या मताधिक्याने आपल्याला निवडून देईल.
या मेळाव्यात आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, आमदार राजेश पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जनसुराज्यचे प्रा. जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, भाजपाचे शहराध्यक्ष विजय जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांनी मनोगत व्यक्त केली.
व्यासपीठावर माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, राहुल चिकोडे, उदयसिंह पाटील-कौलवकर, युवराज पाटील, पी. जी. शिंदे, प्रताप उर्फ भैया माने, ॲड. नीता मगदूम, राहुल चिकोडे, नाथाजी पाटील, सतीश पाटील, कृष्णा चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी केले. आभार नाथाजी पाटील यांनी मानले.