“Waste Management and Alternative to Plastic” या थीमअंतर्गत प्रकल्प सादर
कोल्हापूर – शांतिनिकेतन स्कूल, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत राष्ट्रीय स्तरावर शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. इयत्ता आठवीतील दुर्वांक गावडे आणि जयदित्य पाटील या विद्यार्थ्यांनी केळीच्या सालीपासून तयार केलेल्या ‘बायोप्लास्टिक’ या नाविन्यपूर्ण प्रकल्पाच्या जोरावर राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद पटकावले. “Waste Management and Alternative to Plastic” या थीमअंतर्गत सादर करण्यात आलेल्या या प्रकल्पामध्ये प्लास्टिकला पर्यावरणपूरक पर्याय निर्माण करण्याचा अभिनव प्रयत्न करण्यात आला. केळीच्या सालींसारख्या टाकाऊ सेंद्रिय पदार्थांपासून बायोप्लास्टिक तयार करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.
या यशाची सुरुवात पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र प्रादेशिक फेरीतून झाली. या फेरीत राज्यातील ११६ संघांमधून शांतिनिकेतन स्कूलच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय फेरीसाठी पात्रता मिळवली. त्यानंतर नवी दिल्लीतील डीपीएस मथुरा रोड येथे झालेल्या सीबीएसई राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाच्या अंतिम फेरीत देशभरातील ४२० संघांशी स्पर्धा करत आपल्या थीममध्ये विजेतेपद पटकावले. या उत्कृष्ट कामगिरीमुळे या संघाची निवड आता ‘राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन’ (Rashtriya Bal Vaigyanik Pradarshan) साठी झाली आहे.
या विद्यार्थ्यांना शिक्षक राजकिरण जाधव, श्रीमती फराह काझी आणि विनायक कुंभार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संशोधन, प्रयोग व सादरीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा व आधार दिला. शाळेच्या प्राचार्या श्रीमती जयश्री जाधव आणि संचालिका श्रीमती राजश्री काकडे यांनीही विद्यार्थ्यांना व शिक्षकांना संपूर्ण सहकार्य दिले. विद्यार्थ्यांच्या मेहनती, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि व्यवस्थापनाच्या पाठिंब्यामुळे मिळालेले हे यश संपूर्ण शांतिनिकेतन परिवारासाठी अभिमानाचा क्षण ठरला असून कोल्हापूर तसेच महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात शाळेने मानाचा तुरा रोवला आहे.

















































