महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार…
कोल्हापूर – नवदुर्गेची वेगवेगळी रुपं, पारंपरिक वेषभूषा, देवी अंबाबाईच्या गीतांतून सादर झालेल्या नृत्य – गीतांवर ‘नवदुर्गा नवतारका’ कार्यक्रमात कोल्हापूरकर थिरकले. शाही दसरा कोल्हापूरचा महोत्सवानिमित्त दसरा चौकात आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात शेवटच्या कार्यक्रमातही खुप गर्दी पाहायला मिळाली.
महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. तसेच अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, तहसीलदार अश्विनी अडसूळ, तहसीलदार अनिता देशमुख आणि दसरा महोत्सव नियोजन समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी पोलीस स्मृती दिनानिमित्त स्तब्धता पाळून शहीद पोलिसांना आदरांजली वाहण्यात आली.
महाराष्ट्रातील मनोरंजन क्षेत्रातील नवतारका मीरा जोशी, तेजा देवकर, धनश्री काडगावकर, ऐश्वर्या बडदे, वैशाली जाधव, सोनाली पाटील यांनी बहारदार नृत्ये सादर केली. तर सन्मिता धापटे- शिंदे, मधुरा कुंभार, चैतन्य कुलकर्णी यांनी सुमधुर गीते सादर केली. यावेळी सादर केलेल्या नृत्य, संगीत व गीतांना प्रेक्षकांची टाळ्या शिट्ट्यांच्या गजरात भरभरुन दाद दिली. संकेत जोशी यांच्या स्टँडअप कॉमेडी ने प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. निशांत गोंधळी व राधिका जोशी यांनी सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणली. निलेश पटवर्धन यांची निर्मिती, संकल्पना तर चेतन महाजन व चेतन शिगवण यांच्या नृत्य दिग्दर्शनाने साकारलेल्या नवदुर्गा.. नवतारका कार्यक्रमाने महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता झाली.
महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी यांनी दिली बचत गटांच्या स्टॉलला भेट… महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी यांनी दसरा चौक मार्गावर लावण्यात आलेल्या बचत गटांच्या स्टॉलला भेट दिली. बचतगटातील महिलांनी तयार केलेल्या खाद्य पदार्थांची व गृहोपयोगी वस्तूंची मनमुराद खरेदी यावेळी आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी यांनी केली. तसेच महिलांशी संवाद साधला. |
रविवारी फन स्ट्रीट, रचना – शिल्प प्रात्यक्षिके, रांगोळी स्पर्धा शाही दसरा महोत्सवात रविवारी अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे. फन स्ट्रीट ची मजा, रचना शिल्प प्रात्यक्षिक तसेच गालिचा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शाही दसरा महोत्सवानिमित्त होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
फन स्ट्रीट ची मजा – रविवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते 11 यावेळेत दसरा चौक ते जयंती पुल रस्ता या फन स्ट्रीटवर जुने खेळ, आट्या पाट्या, गलोर, गोट्या, भोवरा, गाणी, नृत्य, फिटनेस झुंबा, चित्र, मार्शल आर्ट, मर्दानी खेळ, गो कारटिंग, महिलांसाठी लेझीम आदी मजा घ्यायला मिळेल.
रचना शिल्प प्रात्यक्षिक – दिनांक 22 ते 24 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत महावीर कॉलेज ते खानविलकर पेट्रोल पंप मार्गावर रचना शिल्प प्रात्यक्षिक व स्पर्धा होणार आहे.
गालिचा रांगोळी स्पर्धा – रविवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी महाव्दार रोडवर दुपारी 2 ते 6 या वेळेत गालिचा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.