नाशिक (प्रतिनिधी): स्तोत्र-मंत्रांचे मानवी आरोग्यावर चांगले परिणाम दिसून येतात. हे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्षाचे जास्तीत जास्त पठण करावे आणि प्रत्येकाने किमान पाच झाडे तरी लावावीत असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र श्री.नितीनभाऊ मोरे यांनी केले.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठामध्ये गुरुपुत्र श्री. मोरे यांच्या उपस्थितीत बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाची मासिक बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीला राज्यासह देशभरातून बालसंस्कार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री. मोरे यांनी प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सेवामार्गातर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उत्सवात प्रत्येक जिल्ह्यातून गणपती अथर्वशीर्षाची २१ लाख आवर्तने पठण झाली पाहिजेत. ही कामगिरी बालसंस्कार प्रतिनिधींनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडून करून घेणे गरजेचे आहे. ही फार मोठी सेवा आहे. त्याचप्रमाणे जवळच्या सार्वजनिक गणेश मंडपात जाऊन सायंकाळच्या आरती नंतर बालसंस्कार प्रतिनिधींनी मार्गदर्शन करावे अशी सूचना त्यांनी केली.
प्रत्येकाने किमान पाच झाडे लावावीत…
सेवामार्गातर्फे सध्या एक कोटी महा वृक्षारोपण अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने किमान पाच झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. असे आवाहन करतानाच या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि युवकांचे त्यांनी कौतुक केले.
पालक-पाल्य सुसंवाद कार्यक्रम घ्या…
पालक आणि पाल्य यांच्यात सुसंवाद आणि ऋणानुबंध निर्माण व्हावेत यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवर पालक सभांचे आयोजन करण्यात यावे, आपापल्या भागातील बालसंस्कार, शिशु संस्कार आणि युवा प्रबोधन वर्ग सुरळीत करावेत, मूल्य संस्कार विभागातील सर्व कार्यरत प्रतिनिधींनी भावी पिढी सुसंस्कारित करण्यासाठी आपला अमूल्य वेळ मूलसंस्कार विभागासाठी द्यावा अशा सूचना श्री मोरे यांनी मार्गदर्शन करताना केल्या.
![]() |
![]() |
![]() |