मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते सन्मान
सिंधुदुर्ग, ओरोस – मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीवर निवड झाल्यानंतर आणि चीनच्या यशस्वी अभ्यास दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बारसिंग यांचा मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्गमधील ओरोस येथे हा सन्मान मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रशांत बारसिंग यांनी तरुण भारत (बेळगाव), पुढारी, सकाळ, दो बजे दोपहर आणि नवराष्ट्र या प्रमुख वृत्तपत्रांसाठी मंत्रालय व विधिमंडळातील अनेक वर्षे सातत्यपूर्ण आणि परखड वार्तांकन केले आहे. 2025-27 च्या कार्यकाळासाठी मंत्रालय-विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीवर ते निवडून आले. त्यांच्या पत्रकारितेतील योगदानात आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील थेट वार्तांकन हे विशेष ठरले आहे.
एप्रिल 2019 मध्ये श्रीलंकेच्या कोलंबो येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे जाऊन त्यांनी सकाळच्या सप्तरंग पुरवणीत सविस्तर वार्तांकन केले.
जुलै 2022 मध्ये श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या वेळी राष्ट्रपती व पंतप्रधान निवासस्थानांवर झालेल्या जनतेच्या आंदोलनाचे वार्तांकन त्यांनी कोलंबो व इतर दहा ठिकाणी जाऊन केले.
नोव्हेंबर 2024 मध्ये चीनच्या शांघाय येथे युनायटेड नेशनच्या वर्ल्ड सिटीज डे परिषदेला हजेरी लावून त्यांनी नवराष्ट्रच्या क्षितिज सदरात अभ्यासपूर्ण लेखन केले.
या सर्व अनुभवांमुळे प्रशांत बारसिंग यांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय घटनांवर थेट वार्तांकनाची संधी मिळाली. त्यांच्या या कामगिरीचा गौरव करत मराठी पत्रकार परिषदेने त्यांचा सन्मान केला. हा सन्मान पत्रकारिता क्षेत्रासाठी प्रेरणादायक ठरणारा आहे. सन्मान स्वीकारताना ज्येष्ठ पत्रकार राजा आदाटे व दीपक केतके यांच्यासह मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.