कारवाईचा नुसता फासच
कराडच्या धाड पथकास हातात काहीच न लागल्याने प्रश्न अनुत्तरित
विशेष प्रतिनिधी |अरुण सूर्यवंशी
कराड उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) धाड पथकाने नुकतीच केलेली कारवाई केवळ दाखवण्यासाठी केली गेल्याचे चित्र समोर येत असून, प्रत्यक्षात “हाती भोपळा” लागल्याचे वास्तव उघड झाले आहे.
कराड-चिपळूण रस्त्यावरील तात्पुरत्या दुरुस्त पुलावरून अवजड वाहने धडधडत असल्याच्या बातम्या छायाचित्रांसह राज्यभर झळकल्या होत्या. त्यानंतर काही काळ वाहतूक थांबवली गेली होती. मात्र, काही दिवसांतच पुलावरून पुन्हा अवजड वाहने मोकळेपणाने धावू लागल्याचे पाहायला मिळाले.
विशेष म्हणजे, सदर पुलावरील वाहतुकीसंदर्भात ठेकेदार किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कोणतीही स्पष्ट व तांत्रिक माहिती दिली गेलेली नाही. तात्पुरत्या दुरुस्तीच्या पुलावरून फक्त हलक्या वाहनांना परवानगी असताना, ठेकेदाराच्या अवजड वाहनांना आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली विशेष मोकळीक देण्यात आली, तर सामान्य वाहनधारक मात्र अडकून पडले होते.
तीन पथके – शून्य निष्कर्ष
आरटीओ विभागाने कारवाईसाठी तीन स्वतंत्र पथके नियुक्त केली होती. मात्र, तीनही पथकांच्या हाती काहीही न लागल्याने कारवाईचा उद्देश आणि वेळेची निवड संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विशेष म्हणजे, ही तपासणी सायंकाळी ५.३० वाजता झाली असल्याचे दाखवण्यात आले, जेव्हा सामान्यतः खनिज वाहतूक थांबलेली असते.
दलालीचा पायपुसण्याजोगा सुळसुळाट
कराड आरटीओ कार्यालयात दलालांचे वर्चस्व असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. ऑनलाईन प्रक्रिया असूनही वाहनधारक व चालकांना कार्यालयाबाहेर दलालांमार्फत कामे करून घ्यावी लागतात, ही गंभीर बाब आहे.
अवैध मालवाहतूक, जुन्या नंबरप्लेटच्या गाड्यांची वाहतूक, विना परवानगी प्रवासी वाहतूक या बाबतीत ठराविक लोक सक्रिय असल्याचे खुलेआम बोलले जात आहे.
विना नंबर प्लेट वाहने – अपघाताचा धोका
तात्पुरत्या पूलावरून जाणा-या अवजड वाहनांवर नंबर प्लेटच नसणे ही चिंतेची बाब आहे. अपघात झाल्यास जबाबदारी कुणाची, आणि तपास कुठून सुरू करायचा, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
आरटीओ प्रतिक्रिया देण्यास असमर्थ – संपर्क क्रमांक हवा
कारवाई संदर्भात आरटीओ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, “मोबाईल खाजगी आहे, उचलण्याचे बंधन नाही” अशी भूमिका घेतली गेली. अशा वेळी, कराड आरटीओ कार्यालयाचा २४x७ आपत्ती काळातील संपर्क क्रमांक जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे.
निसर्गाच्या वेढ्यात कृत्रिम धोका?
कोयना धरण विसर्ग व डोंगरातील पाण्याचा वेढा तात्पुरत्या पुलाला बसला आहे. यामुळे अवजड वाहतूक सुरू राहिल्यास पुढील काही दिवसांत या रस्त्याचा पूर्णतः संपर्क तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने ठेकेदार, आरटीओ व संबंधित अधिकार्यांची जबाबदारी ठरवून कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सामाजिक स्तरावरून पुढे येत आहे.


















































