रुकडी स्टेशन आरक्षण केंद्रावर तत्काळ तिकीट दलालाला रेल्वे पोलिसांची पकड!
रुकडी (ता. हातकणंगले) : रेल्वे प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या तत्काळ तिकीट दलालावर रेल्वे सुरक्षा दल (RPF) कोल्हापूरच्या पथकाने कारवाई करत रंगेहाथ पकडले आहे.
विश्वासार्ह सूत्रांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर RPF थाना कोल्हापूरचे इन्स्पेक्टर विजय शंकर माझी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात SIPF आर. एम. पाण्डेय, ASI आर. डी. पाटील, HC संजय कांबळे, HC मुकुंद आणि CT शरद कांबळे यांचा समावेश होता.
गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने रुकडी रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रावर छापा टाकून तिकीट दलाल विवेक महादेव कानडे (वय २८, रा. संग्राम चौक, इचलकरंजी) याला ताब्यात घेतले. आरोपीकडे ३ नग तत्काळ आरक्षण तिकीट सापडले असून त्यांची एकूण किंमत सुमारे ४,१५० रुपये आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पुढील सुनावणीसाठी जिल्हा न्यायालय, कोल्हापूर येथे हजर करण्यात येणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, तिकीट नेहमी अधिकृत IRCTC वेबसाइट किंवा अधिकृत आरक्षण केंद्रातूनच बुक करावे आणि अवैध दलालांपासून सावध रहावे.