कोल्हापूर, सांगलीत दोन महिन्यात ग्राहकांच्या 27 हजार 597 तक्रारी निकाली…
कोल्हापूर – महावितरणकडून ग्राहकांच्या तक्रारींचे विनाविलंब निराकरण करण्यास प्राधान्य दिले जात आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात ग्राहकांच्या 27 हजार 597 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. त्यात विद्युत पुरवठा विषयक 14 हजार 116, वीजदेयकांच्या 12 हजार 681 व इतर 800 तक्रारींचा समावेश आहे. महावितरण यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी ग्राहकांच्या समाधानासाठी तत्पर सेवा बजावित आहेत.
![]() |
![]() |
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी ग्राहकसेवांच्या कृती मानकांनुसार ग्राहक तक्रारींची त्वरीत दखल घेऊन त्या विनाविलंब निकाली काढण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना दिलेल्या आहेत. त्यानुसार महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळातील कोल्हापूर जिल्ह्यात दोन महिन्यात प्राप्त 19 हजार 492 पैकी 19 हजार 462 तक्रारी निकाली काढलेल्या आहेत. त्यात विद्युत पुरवठा विषयक 11 हजार 468, वीजदेयकांच्या 7 हजार 409 व इतर 585 निकाली तक्रारींचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यात दोन महिन्यात प्राप्त 8 हजार 175 पैकी 8 हजार 135 तक्रारी निकाली काढलेल्या आहेत. त्यात विद्युत पुरवठा विषयक 2 हजार 648, वीजदेयकांच्या 5 हजार 272 व इतर 215 निकाली तक्रारींचा समावेश आहे.
| महावितरणने ग्राहकांना विद्युत पुरवठा, वीज देयक व इतर तक्रारी अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप, मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्र, ई-मेलव्दारे घरबसल्या मांडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहक खंडित वीज पुरवठा, अयोग्य दाबाचा वीज पुरवठा, केबल दोष, रोहित्रातील बिघाड, विद्युत वाहिन्या तुटणे, विद्युत खांब पडणे/ वाकणे, वाढीव वीज बिल, मीटर वाचन, नादुरुस्त मीटर, सरासरी वीजबिल, वीजबिल प्राप्त न होणे, कमी वीजबिल, अपघात, मीटर जळणे, बनावट/ फसवे संदेश, विजचोरी इ. बाबतच्या तक्रारी दाखल करु शकतात. |
महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावरील ग्राहक पोर्टलवर तक्रार नोंदविता येते. महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राचे टोल फ्री क्रमांक 1912 वा 19120 वा 1800-212-3435 वा 1800-233-3435 24 तास ग्राहक सेवेत आहेत. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून वीजपुरवठा खंडितची तक्रार 022-50897100 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन नोंदविण्याची सोय आहे.






















































