“‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमात प्रकाश आबिटकरांचा प्रत्यक्ष सहभाग”

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

“भाकरीच्या घासात माया, चिखलात मेहनतीचा संवाद – पालकमंत्र्यांचा एक दिवस बळीराजासाठी”

राधानगरी (विनायक जितकर) – मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या “एक दिवस, माझ्या बळीराजासाठी” या उपक्रमाला कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी खरी शेतकरीभावना आणि मातीची नाळ जपणारा स्पर्श दिला. आज राधानगरी येथील शेतात त्यांनी डोक्यावरचे येरलं बाजूला करत बाजूला करत, अंगावर पाऊस झेलला आणि शेतात उतरून पावर टिलर चालवत चिखलगुट्टा (मशागत) केली. त्यानंतर वाफ्यामध्ये स्वतः भात रोपांची लागवडही केली. हे दृश्य पाहून उपस्थित शेतकरी थक्क झाले. मंत्री म्हणजे फक्त मंचावरचे भाषण करणारे नव्हेत, तर प्रत्यक्ष राबणारे असू शकतात, हे त्यांनी दाखवून दिले.

मशागत संपल्यावर पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत बांधावर मांडीला मांडी लावून झुणका-भाकरी, ठेचा चाखत संवाद साधला. यावेळी बोलताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले “शेती ही केवळ व्यवसाय नसून माझ्या बळीराजाचे जीवन आहे. पावसात भिजून मशागत करताना, रोपं लावताना शेतकऱ्यांच्या श्रमांची तीव्रता अनुभवली. शेतात घाम गाळणाऱ्या प्रत्येक हाताला शासनाच्या माध्यमातून बळ देण्याचा माझा प्रयत्न आहे. शेतीशी माझी नाळ जुनी आहे आणि ती आणखी घट्ट करण्यासाठीच मी थेट शेतात उतरलो. प्रशासन शेतकऱ्यांच्या मदतीला तत्पर आहे, आणि आगामी काळातही शेतीउत्पादन वाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील.” शेतीविषयक अडचणी, पाणी टंचाई, बियाणे उपलब्धता, बाजारभाव यावर त्यांनी मनमोकळेपणाने चर्चा केली.

पालकमंत्री आबिटकर यांच्या संकल्पनेतून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त शाहू जयंती पंधरवड्यात कृषी विभाग, जिल्हा प्रशासन व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सुमारे 300 गावात एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी या उपक्रमात सहभागी झाले. राधानगरीच्या शेतावर संपन्न झालेल्या ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भर पावसात अनंत कृष्णा चौगुले यांच्या शेतीच्या बांधावर उतरुन शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडी-अडचणी, व्यथा जाणून घेत. नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं.

या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शिवार फेरी, शेती शाळा, वृक्षारोपण, शेतकऱ्यांसोबत चर्चा व मार्गदर्शन आदी उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांच्या समस्या, अडी-अडचणी, प्रश्न व त्या त्या गावांतील समस्या, जाणून घेण्यात आल्या. पीएम किसान, ॲग्रीस्टॅक योजने अंतर्गत फार्मर आयडी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान अशा महत्त्वपूर्ण योजनांबरोबरच विविध विभागांच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली.

यावेळी राधानगरी-कागलचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, कृषी महाविद्यालयातील सहयोगी अधिष्ठाता डॉ. अशोककुमार पिसाळ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे दत्ता उगले, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, तहसीलदार अनिता देशमुख, कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे, कुंभार, संभाजी आरडे, दीपक शेट्टी, संग्राम पाटील, विजय पाटील, संतोष चौगले, तानाजी चौगले, सुहास निंबाळकर, संजय पाटील, चंद्रशेखर कांबळे, विलास डवर, अनिल बडदारे, आत्माचे सुनील कांबळे, तसेच कृषी, महसूल व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.