डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने….कर्तव्य, समाजभान आणि लोकाभिमुख नेतृत्व

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

रंजित आवळे- (चिपळूण)

कर्तव्य, समाजभान आणि लोकाभिमुख नेतृत्व — डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने यांचा चिपळूणवासीयांना निरोप

चिपळूण : कर्तव्यपरायणता, धडाकेबाज कारवाई आणि समाजाशी घट्ट नाळ जपणारे चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) राजेंद्रकुमार राजमाने यांची बदली रत्नागिरी येथील जात पडताळणी विभागात झाली आहे. त्यांच्या जागी मुंबई येथून प्रकाश बेले यांची नियुक्ती झाली असून ते लवकरच पदभार स्वीकारतील.गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात राजमाने यांनी केवळ गुन्हे उकलण्यातच नव्हे तर शहराच्या सुरक्षा व्यवस्थेतही ठसा उमटवला. सावर्डेतील खून प्रकरणाचा उलगडा, गुहागरमधील खुनाचा तपास, चोऱ्यांवर नियंत्रण, आणि शहरात ८६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा पुढाकार — हे त्यांचे काही विशेष उपक्रम ठरले. दूरदृष्टी, तत्परता आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यामुळे ते नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरले.

माणुसकीचा आधार

मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील पुरग्रस्त भागातील रहिवासी असलेले राजमाने, पुरग्रस्तांची वेदना स्वतःची मानतात. २०१९ च्या महापुरात त्यांनी मदतकार्यात स्वतः झोकून दिलं. तर कोरोना काळात रावेत परिसरातील गरीब, हातावर पोट असणारे मजूर तसेच परप्रांतीय कामगारांना अन्नधान्य, किराणा किट वाटप आणि त्यांच्या सुरक्षित गाववापसीसाठी प्रशासनाशी समन्वय साधला.

शांत, अभ्यासू आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व

बोलण्यात अतिशय शांत, अभ्यासू, आणि नव्या विषयाची ओढ असलेले राजमाने जेथे गेले तेथील गाव, शहर, जिल्ह्याची माहिती, चालिरिती, परंपरा आणि संस्कृती जाणून घेणं हे त्यांचं वैशिष्ट्य. लोकांत मिसळणं हा त्यांचा सहज स्वभाव. तसेच क्रीडा क्षेत्रातही ते अग्रेसर राहिले — टेबल टेनिस, बॅडमिंटन, योगासन आणि आयुर्वेदाचा अभ्यास यामध्ये त्यांची विशेष रुची होती.

 प्रत्येक ठिकाणी काैतुकास्पद कारकिर्द

१९९२ मध्ये पीएसआय म्हणून निवड होऊन १९९४ मध्ये अंधेरी पोलीस ठाण्यात पहिली नियुक्ती मिळाली. त्यानंतर विडोशी, सांगली, विश्रामबाग, शिवणी वांगी, राज्य गुप्त वार्ता विभाग, अमरावती, कराड, महाबळेश्वर, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड अशा अनेक ठिकाणी त्यांनी सेवा बजावली. अमरावतीत वाहतूक प्रमुख असताना वाहतूक व्यवस्थापनातील यशस्वी प्रयोग आणि जातीय तणाव हाताळण्यातील कौशल्य यासाठी त्यांची विशेष दखल घेतली गेली.

अमरावतीत कार्यरत असताना तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि महाबळेश्वर येथे अभिनेता आमिर खान यांच्याशी त्यांची भेट हे त्यांच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय क्षण ठरले.

सर्वसामान्यांना आपलेसे वाटणारे अधिकारी/ पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएशनचेही मैत्रिचे अनाेखे नाते जपले.

चिपळूणच्या नागरिकांच्या मनात त्यांनी अधिकारी म्हणूनच नव्हे तर जनतेचा आपला माणूस म्हणून स्थान मिळवलं. Positive Watch Youth Association या शासन मित्र, पोलीस मित्र संघटनेला त्यांनी नेहमी मौलाचे सहकार्य दिलं. मार्गदर्शक म्हणून सोबत राहिले, आणि Positive Watch मीडियावर नेहमीच त्यांची वाचनीय नजर राहिली.त्यांच्या बदलीनंतर चिपळूणवासीयांच्या मनात हळहळ व्यक्त होत असली तरी, नव्या पदावरही त्याच कार्यतत्परतेने आणि माणुसकीच्या बळावर ते नवा ठसा उमटवतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. आता तर त्यांच्याकडे जातपडताळणीचे महत्वाचे कार्य समाेर आले आहे. तरुणांच्या शैक्षणिक कामासाठी आणि पालकांच्या मनावरील ओझे कमी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असणारे. त्यामुळे या पदालाही ते निश्चितच न्याय देतील असा विश्वास आहे.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.