शाळकरी विद्यार्थ्यांना ट्रॅफिक गार्डनमध्ये थेट पोलीस मार्गदर्शनाचा लाभ — सुरक्षिततेच्या धड्यांसह शस्त्रांची ओळख, श्वान पथकाची प्रात्यक्षिके आणि सिग्नल प्रतिकृतीतून रस्ते शिस्तीचे प्रशिक्षण!
कोल्हापूर :
शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पुढाकारातून पोलीस मुख्यालय येथील ट्रॅफिक गार्डनमध्ये विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे अनोखे धडे देण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला विशेष गती मिळाली आहे.
नव्या पिढीला ट्रॅफिक संस्कार
वाहन चालवताना सुरक्षितता कशी राखायची, सिग्नलचे रंग काय सांगतात, झेब्रा क्रॉसिंगवर कशी दक्षता घ्यायची, बोगद्यांत ओव्हरटेक का करू नये — यासारख्या अत्यंत उपयुक्त बाबी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमधून समजावून सांगण्यात आल्या.
शस्त्रसंग्रह आणि श्वान पथकाकडून थरारक प्रात्यक्षिके
विद्यार्थ्यांनी केवळ वाहतूकच नव्हे तर पोलीस दलातील शस्त्रसंग्रहही जवळून पाहिला. बी.डी.डी.एस. श्वान पथकाच्या कुशल श्वानांनी स्फोटक शोधण्याची थरारक प्रात्यक्षिके दाखवली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलीस दलाबद्दल अभिमान निर्माण झाला.
फ्लॅग ऑफने घेतली सुरुवात
या उपक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुवर्णा पत्की मॅडम, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती सुवर्णा सावंत, चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सचिव जयेश ओसवाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पालकांना आवाहन : मुलांना ट्रॅफिक साक्षर करा!
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील सर्व शाळांना आवाहन केले आहे की, आपल्या पाल्यांना शालेय वेळेत ट्रॅफिक गार्डनमध्ये प्रशिक्षणासाठी जरूर पाठवावे. कारण आजचे हे धडे उद्याच्या सुरक्षित प्रवासाची हमी आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केले. उपस्थितांचे आभार आरएसपीचे जिल्हा समादेशक श्रीकांत मोरे यांनी मानले.
_—_———-_—————-_—_—-_————_–_—-
ट्रॅफिक गार्डनमधील पोलीस प्रशिक्षण हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्याचा वाटा!